काँग्रेसचे चाणक्य ‘ अहमद पटेल ‘ यांचे दुःखद निधन..!

| नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली. “जड अंतःकरणाने माझे वडील अहमद पटेल यांचं निधन झाल्याची घोषणा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दी ठिकाणी जाणं टाळून कोरोना नियमांचं पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिगचं पालन करा,” असं फैजल पटेल यांनी म्हटलं आहे. अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबरला स्वतः ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्याबरोबरच काँग्रेसच्या नेत्यांनी अहमद पटेल यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असल्यानं त्यांचा पक्षात मोठा दबदबा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *