काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे भूतं; चंद्रकांत पाटलांचा घणाघात..!

| सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही, त्यामुळं तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे लागतेय, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर टीका केली आहे. मंदिर सुरू करण्यासाठी आज मिरजेत ‘उद्धवा दार उघड’ म्हणत घंटानाद आंदोलन भाजपकडून करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापार, दुकाने, मंदिरे बंद केली होती. मात्र आता या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन सर्व काही सुरू करण्यात येत आहे. दारू दुकान, हॉटेल, लॉज सर्व व्यापार आता सुरू झाला आहे, मात्र सरकारने अद्याप मंदिरे खुली केली नाहीत, त्यामुळे राज्यातील मंदिरे तातडीने खुली करावेत या मागणीसाठी भाजपकडून राज्य सरकार विरोधात राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते.

सांगलीच्या मिरजेतही भाजपकडून आंदोलन करण्यात आले. शहरातील दत्त मंदिरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी उद्धवा दार उघड अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मंदिर न उघडण्याच्या निर्णयाबाबत घणाघाती टीका केली. सरकारकडून आता दारूचे दुकान, रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात येत आहेत. मात्र मंदिर उघडण्याबाबत सरकार निर्णय घेत नाही. देशभरात सगळ्या ठिकाणी आता मंदिरात सुरू झालेली आहेत. मात्र महाराष्ट्रातील सरकार मात्र मंदिर उघडण्यास तयार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यातील मंदिरं, देवस्थान सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडीनं घंटानाद आंदोलन केलं. गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करताना दिसले. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरं मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत. मंदिरं दर्शनासाठी खुली करा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांमधील मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे, पण महाराष्ट्र सरकारच अजून मंदिरं खुली करण्यास तयार नाही, असा आरोप विविध धार्मिक संस्थानांनी केला आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *