कडोंमपात समाविष्ट ९ गावांमधील नागरिकांना मालमत्ता करात दिलासा, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेतच्या बैठकीत आयुक्तांचा हिरवा कंदील..!

| कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महापालिका हद्दीत राहिलेल्या नऊ गावांमधील २००२ पर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता करात तब्बल दोन तृतीयांश इतकी घट करण्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी घेण्यात आला. या मालमत्तांना २००२ प्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील करमूल्यानुसार कर आकारण्यात येणार असून याचा फायदा नागरिकांना होणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत घेतलेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यास हिरवा कंदील दिला असून या बैठकीला महापौर विनिता राणे याही उपस्थित होत्या. मालमत्ता कर कमी करून येथील रहिवाशांना दिलासा देण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे व लोकप्रतिनिधी आग्रही होते.

सन २००२ मध्ये ही गावे महापालिकेतून वगळण्यात आली. सन २०१५ मध्ये महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा त्यांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला. मात्र, त्यानंतर या गावांमधील मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या.

या ९ गावांमधील मालमत्ता कर कमी करून दिलासा देण्याची मागणी सातत्याने होत होती. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौर विनिता राणे व या नऊ गावांमधील स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या गावांमधील मालमत्तांना सन २००२ चे दर आधारभूत मानून त्या प्रमाणात पुनर्मूल्यांकन करून मालमत्ता कराची आकारणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मालमत्ता करात तब्बल दोन तृतीयांश इतकी घट होणार असून त्यामुळे या गावांमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, तसेच सन २००२ ते २०१५ पर्यंतच्या एम.एम.आर.डी.ए. आणि जिल्हापरिषद मान्यताप्राप्त बांधकामांना सदर नियमावली लागू होईल असे सांगून खा. डॉ. शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *