” कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना ” म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी साधला निशाणा..!

| शिरूर | एखाद्या नटीच्या वक्तव्यावर रिअॅक्ट व्हावं इतकी ती मोठी व्यक्ती नाही. तिच्यावर रिअॅक्ट न झाल्यानं आपल्या जीवनावर काही फरक पडणार आहे का? असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न काय आहेत, त्यामुळं माझ्या आणि आपल्या जनतेच्या जीवनावर फरक पडणार आहे. कुठल्यातरी नटीच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्याने फरक पडणार नाही, असंही कोल्हे म्हणाले होते. दरम्यान त्याच मतदारसंघातील माजी सेनेचे कार्यक्षम खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ” कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना ” अशी अश्या आशयाचा फेसबूक पोस्ट करून कंगना प्रकरणास , मदन शर्मा प्रकरणावर देखील रोखठोक भूमिका मांडली आहे.

काय म्हंटले आहे त्यांनी..!

जगात कृतघ्न लोकांची अजिबात कमतरता नाही. हा आजार कोरोनापेक्षा महाभयंकर आणि घातक आहे. कृतघ्नता या आजाराचं मुख्य लक्षण म्हणजे आपल्याला ज्या व्यक्ती, संस्था, संघटना किंवा शहरानं नाव दिलं, संपत्ती दिली, प्रसिद्धी दिली, मानमरातब मिळवून दिला, लोकप्रियता दिली त्यांचे उपकार आपण विसरतो. आपण सेल्फमेड आहोत, असं उगाच वाटायला लागतं. अधूनमधून वेड्यासारखी वक्तव्ये करण्याची हुक्की येते. मानसिक आजार असल्यासारखी वर्तणूक व्हायला लागते. कृतघ्नतेचा आजार असलेल्या व्यक्तीला असंबद्ध बडबड करण्याची सवय जडते आणि मीडिया आपला टीआरपी वाढविण्यासाठी अशा बेताल बडबड्यांना प्रसिद्धी देतो.

कृतघ्नतेचा विकार जडलेल्या एका व्यक्तीची आपल्याला नुकतीच नव्याने ओळख झाली. वास्तविक मला स्वतःला “क्वीन, तनु वेड्स मनू”, या चित्रपटातून उत्कृष्ट कलाकार म्हणून भावलेली ही अभिनेत्री…तीन राष्ट्रीय पुरस्कार जिच्या नावावर आहेत अशी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आपल्याला या व्यक्तीची ओळख होती. मात्र, नुकत्याच घडलेल्या काही घटना आणि वक्तव्यांमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील सभ्य, सुसंस्कृत आणि शालीनतेचा मुखवटा उतरला नी एका क्षणात असभ्य, असंस्कृत आणि बालीश बडबड करणाऱ्या कृतघ्न व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले.

अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही, मी कंगना राणावत हिच्याबद्दलच बोलतो आहे. आज जागतिक हिंदी भाषा दिवस आहे. त्यामुळे कंगनाला अत्यंत समर्पक आणि चपखल ठरेल, अशी हिंदी भाषेतील एक म्हण वापरण्याचा मोह मला आवरता येत नाही. ‘जिस थाली में खाना उसी में छेद करना…’ म्हणजे आपल्यावर उपकार करणाऱ्याचे नुकसान होईल, त्याला फटका बसेल, अशा पद्धतीने वर्तन करायचे. कंगनाने तरी दुसरे काय केले ? कृतघ्नतेसाठी आणि नालायकपणासाठी सर्वाधिक मोठा पुरस्कार द्यायला झाला, तर तो कंगनालाच द्यावा लागेल.

आपल्या घरातून पळून महाराष्ट्रात नशीब आजमाविण्यासाठी आलेल्या कंगना नामक युवतीला मुंबईने सामावून घेतले. त्याच मुंबईबद्दल ही बाई कृतघ्नतेचा सूर आळवतेय. मुंबईने तिला नाव दिले, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मान मिळवून दिला त्या मुंबईची तुलना तिने पाकव्याप्त काश्मीरशी केली. अग बये, तू जर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असतीस तर तुला अभिनेत्री बनण्याची संधी मिळणं सोड, अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची संधी तरी मिळाली असती का ? याचा विचार कर. तुझी जीभ हासडून टाकली असती किंवा गायब करून तुझी हत्याही करण्यात आली असती. तुझा मृतदेहही सापडला नसता. मुंबईत आहेस म्हणून सुरक्षित आहेस इतकं लक्षात ठेव.

अर्थात, कृतघ्नतेचा हा विकार कंगनाला आता जडलेला नाही. पहिल्यापासूनच ती कृतघ्नतेची शिकार आहे. अनेक मुलाखती पाहिल्या आणि वक्तव्ये ऐकल्यानंतर कंगनातील कृतघ्नतेचे दर्शन आपल्याला वारंवार घडते. मध्यंतरी एका मुलाखतीत कंगना म्हणाली होती, की तुम्हाला बॉलिवूडमध्ये सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचायचं असेल, तर एखाद्या सुपरस्टार अभिनेत्याबरोबर लफडं करण्यात काहीच गैर नाही. आणि या बयेनं तसं केलंही… ही या कंगनाची लायकी.

कंगना ही मधली काही वर्षे हृतिक रोशन या अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती म्हणे. हृतिकचं लग्न झालेलं तरीही बॉलिवूडमध्ये बस्तान बसविण्याच्या उद्देशानं कंगनानं त्याला पटवलं. दोघांचं अफेअर सुरू झालं. अनेक वर्ष अफेअर चाललं होतं. परिणामी हृतिकचा घटस्फोट झाला. त्याची पत्नी सुझान त्याला सोडून गेली. गरज संपल्यानंतर कंगनानंही त्याला सोडलं. म्हणजे एकतर लग्न झालेल्या पुरुषाबरोबर अफेअर करायचं आणि गरज संपल्यानंतर कृतघ्नपणे त्यालाही सोडून द्यायचं.

हृतिक रोशन शिवाय आदित्य पांचोली, अध्ययन सुमन ह्यांच्याही आयुष्याचं ह्या बयेनं मानेरं केलं. हृतिकला का सोडलं तिनं याचं काही ठोस कारण माहिती नाही. पण तो म्हणे ड्रग्ज घ्यायचा आणि त्यामुळं हिनं त्याला सोडचिठ्ठी दिली. बरं! ही बया काय धुतल्या तांदळासारखी आहे का? मुंबईत आल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे ही ड्रग्जच्या प्रचंड आहारी गेली होती, असं म्हणतात. अफू, चरस, गांजा, ब्राउन शुगर की आणखी काय घ्यायची देवाला माहिती. पण प्रचंड ड्रगच्या आहारी गेल्याचे आरोप होणारी कंगना हृतिकला का सोडते तर म्हणे तो ड्रग्जसेवन करतो म्हणून. आहे की नाही वेड्याचा बाजार…

टीव्हीवर बोलताना आणि सोशल मीडियावर व्यक्त होताना आज झाशीची राणी आणि शिवाजी महाराजांचं नाव घेणारी ही बया कधीकाळी व्याभिचारी नी आणि अमली पदार्थांचं सेवन करणारी गांजाडी होती, हे आम्ही विसरू शकत नाही. त्यामुळंच या महान व्यक्तिमत्त्वांचं नाव घेण्याचीही तिची लायकी नाही, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं.

नशेमध्ये बोलते की काय समजायला मार्ग नाही. पण काय म्हणते हि बया तर, “तुम्हास महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचा इतका अभिमान आहे आणि इतक्या बढाया मारता तर मराठी भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांवर एक तरी चांगला चित्रपट झालाय का ?… अगं बये, तुला माहिती नाही पण भालजी पेंढारकर नावाचे एक महान दिग्दर्शक मराठीत होऊन गेले. त्यांची हयात गेली ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यात. त्यांनी छत्रपती शिवरायांवर केलेले चित्रपट बघ आणि मग बोल. आमच्या महेश मांजरेकरनं मध्यंतरी केलेला चित्रपट बघितला तरी तुला कळेल महाराष्ट्रातील दिग्दर्शकांची ताकद काय आहे… काहीही माहिती न घेता बोलणं याला आमच्या मराठीत “उचलली जीभ लावली टाळ्याला”!

शिवसेना हा मा. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष आहे. मा. बाळासाहेबांसोबत माँसाहेब सद्यस्थितीत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत रश्मीवाहिनी यांनी ‘महिला आघाडी’च्या मार्फत सदैव महिलांच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष दिले आहे. तुझ्या ज्या काही समस्या होत्या त्या शिवसेना या पक्षा इतक्या दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये सोडविल्या जातील असे मला वाटत नाही. स्रियांचा सन्मान करण्याची आमची संस्कृती आहे. तू मात्र जिभेवरील नियंत्रण घालवून परवा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी केला. अरे तुरे म्हणून त्यांना अवमानकारक बोललीस. बहुधा जुन्या सवयीनुसार काहीतरी नशा करून सोशल मीडियावर बाइट दिला का काय माहिती? हिमाचल प्रदेशातून मोठया तोऱ्यात बाईट दिलास, ती मी नऊ सप्टेंबरला मुंबईत येते आहे. काय उखाडायचं आहे ते उखाडा. आता मुंबई महापालिकेनं तुझ्या ऑफिसचं अनधिकृत बांधकाम उखडलं तर तुला इतकं चिडायला काय झालं… तू उखाड म्हटली आणि पालिकेनं उखडलं. काय चुकलं. मुंबई महापालिकेनं करून दाखवलं. आणि त्याचा संबंध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी जोड्ण्याचं काय कारण…

बहुमताने महाराष्ट्रात विराजमान झालेले आणि कोरोनाच्या महासंकटावर मात करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख तू एकेरी पद्धतीने करते, यातच तुझे संस्कार आणि प्रवृत्ती दिसते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सभ्य मुख्यमंत्र्यांनी तुझ्या वक्तव्याला काडीचीही किंमत दिली नाही. तुझी लायकीच नाही ती. उद्धवसाहेब काही बोलणार नाहीत, पण शिवसैनिक तुझी मस्ती उतरवायला मागेपुढे पाहणार नाहीत. आज तुझं ऑफिस तोडलंय. त्यातून काय समजायचं ते समजून घे. उद्या काय करतील आणि कसा धडा शिकवतील, याचा तुला अंदाजही येणारही. मग फक्त सोशल मीडियावर बडबड करणंच तुझ्या हातात शिल्लक राहील.

तिकडे मदन शर्मा नावाचा कोणीतरी एक निवृत्त नौदल अधिकारी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध करतो आणि मग फटके खातो. व्यंगचित्रात काय दाखवलं आहे, हे पाहिल्यानंतर शिवसैनिक का चिडले, याचा अंदाज आपल्याला येईल. एखाद्याचे आई-बाप बदलून दाखविणं हे कसलं व्यंगचित्र. हे तर विकृतचित्र. असं व्यंगचित्र काढणाऱ्याला आणि ते आक्षेपार्ह कॉमेंटसह प्रसिद्ध करणाऱ्याला फटकाविणार नाही तर काय करणार… मदनच्या समर्थनार्थ पुढे येणाऱ्यांचे आई-बाप बदलले आणि त्याचं चित्र काढलं तर चालेल का, हे आधी स्पष्ट व्हायला हवं. आणि तो नौदलातील निवृत्त अधिकारी आहे म्हणून जे लोक बोंब मारतायेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. त्यानं ते व्यंगचित्र मदन शर्मा म्हणून प्रसिद्ध केलं होतं. नौदल अधिकारी म्हणून नाही. नौदलाला ते व्यंगचित्र मान्य आहे का ? हे मदनचा पुळका आलेल्यांनी पहिलं स्पष्ट करावं. नौदलात इतकी वर्षे राहून देखील ज्याला सार्वजनिकपणे काय शेअर करावं आणि काय करू नये, हे समजत नाही, त्या ठोंब्याबद्दल न बोललेलंच बरं. चूक स्वतः करायची आणि फटके पडले की नौदलाची ढाल पुढे करायची. हे धंदे बंद करा आणि एक लक्षात ठेवा ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. इथं चुकीला माफी नाही. फटके तर पडणारच. स्वतः झक मारायची आणि फटके पडले की शिवसेनेच्या नावानं रडायचं हा धंदा बंद करा.

आमच्या नादाला लागू नका…शिवसेना आणि शिवसैनिकांच्या मनात वाघ असला आणि आमची वृत्ती वाघाची असली, तरीही घोडा हा आमचा आवडता प्राणी आहे हे लक्षात ठेवा…

शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते तथा माजी खासदार , शिरूर लोकसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *