केंद्राच्या अहवालात महाराष्ट्राच्या कोरोना बाबतच्या कामाची स्तुती..!

| नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१ टक्के असून ऑक्टोबर महिन्यात यात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे, अशी सकारात्मक नोंद केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाच्या मासिक अहवालात घेण्यात आली आहे.

जगासह भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाला असून केंद्र व राज्य सरकारांनी या महामारीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना अवलंब‍विल्या आहेत. महाराष्ट्राने उत्तम आरोग्य सेवा आणि रास्त दरात कोरोना चाचण्या उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे आदी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत.

परिणामी ऑक्टोबर २०२० महिन्यात राज्यात कोरोना बाधितांचे प्रमाण घटले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे आर्थिक कार्य विभागाच्या ऑक्टोबर २०२० च्या मासिक अहवालात दिसून आले आहे.

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट :

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत देशात ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सुधारणा झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्येही स्थिती सुधारल्याचे अहवालात दिसून येते तर कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात १० लाख लोकांमागे १३ हजार ९४५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील ६.३ टक्के रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१ असल्याचे अहवालात नमूद आहे. राज्यात कोरोनाने मृत होणाऱ्यांचे प्रमाण २.६ टक्के आहे. आठवड्याला सरासरी रूग्ण वाढ दर हा ०.३ टक्के असल्याचे या अहवालात दिसून येते. राज्यात १० लाख लोकांमागे ७५ हजार ७२७ कोरोना चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत ९२ लाख ५० हजार २५४ चाचण्या करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

राज्यात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात कमालीची सुधारणा झाली आहे. आतापर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. पुणे जिल्ह्यात ३ लाख ६ हजार २०८ रूग्ण बरे झाले आहेत तर मुंबईमध्ये २ लाख ३४ हजार ५५१, ठाणे जिल्ह्यात २ लाख ४ हजार ६९०, नागपूर जिल्ह्यात ९६ हजार ८८८ आणि नाशिक जिल्ह्यात ९१ हजार ५०७ कोरोना बाधित रूग्ण बरे होवून घरे गेले असल्याचे आर्थिक कार्य विभागाच्या आकडेवारीत दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *