कामा, जेजे सह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात परीचारिकांचे दोन तास काम बंद आंदोलन..!

| मुंबई | महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. नर्सेस फेडरेशनने परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता शासनाला वारंवार निवेदने देऊन चर्चेसाठी वेळ मागितला, परंतु शासनाने व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस् फेडरेशन तर्फे आज राज्यव्यापी दोन तास काम बंद आंदोलन करण्यात आले.

आपल्या न्याय मागण्या मान्य करून घेण्याकरिता राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात आज दोन तास कामबंद आंदोलन यशस्वी केले आहे. याबाबत शासनाने वेळीच दखल घेऊन प्रश्न सोडवावेत असे आवाहन बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी केले आहे. वास्तविक पाहता गेले चार महिने आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे अहोरात्र मेहनत घेत असल्याने राज्यात कोरोना महामारी आटोक्यात येत आहे. अशा वेळी परिचारिकांच्या रास्त मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस श्री. दौंड यांनी केली आहे.

काय आहेत परिचारिकांच्या मागण्या :

✓ महाराष्ट्रातील परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून रिक्त असलेली ६००० पदे कायम स्वरुपी तातडीने भरावी. कंत्राटीकरण करु नये.
✓ परिचारिकांना रोटेशननुसार ७ दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर ७ दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी. कोविड ड्युटी ४ तासांच्या शिफ्टमध्ये असावी.
✓ कोविड बाधित व संशयित रुग्णांच्या सेवेत कार्यरत परिचारिकांना दर्जेदार PPE किट, N-95 मास्क, इतर साहित्य त्वरित मिळावे.
✓ कोविड ड्युटी नंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी.
✓ ह्रृद्यरोग, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविड ड्युटी मध्ये सुट मिळावी.
✓ कोविड रुग्णास सेवा देतांना मृत्यु आल्यास शासनाने घोषित केलेली ५० लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसेच वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी.
✓ परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्या साठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असाव्यात.
✓ बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड रुग्णास सेवा देणाऱ्या परिचारिकांना ३०० रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येतो, त्याप्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात यावा.
✓ कोविड सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने विनाविलंब समिती गठित करावी.

Leave a Reply

Your email address will not be published.