कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी पार पडणार निवडणूक..

| नवी दिल्ली | देशात कोरोना संकट असले तरी वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. त्यातून आयोगाने शुक्रवारी कोरोना संकटकाळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यानुसार, मतदारांना इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचे (ईव्हीएम) बटन दाबण्याआधी नष्ट करता येण्याजोगे हातमोजे पुरवले जाणार आहेत.

बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबर अखेरीस समाप्त होणार आहे. त्यामुळे त्या राज्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. त्याशिवाय, काही राज्यांत विधानसभा पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत. तसेच मनपाच्या निवडणुका देखील बऱ्याच ठिकाणी घ्याव्या लागणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, निवडणूक आयोगाकडून कोरोना संकट ध्यानात घेऊन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली.

त्यानुसार खालील बाबींकडे आयोगाने लक्ष दिले आहे.
१. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
२. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर बसवले जाईल.
३. प्रत्येक केंद्रावर १ हजार ५०० ऐवजी १ हजार मतदार त्यांचा हक्क बजावू शकतील.
४. कोरोनाबाधित अखेरच्या तासात मतदान करू शकतील.
५. कोरोनाबाधितांना टपालाद्वारे मतदान करण्याचा पर्यायही मिळणार आहे.
६. मतदारासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.
७. प्रतिबंधित क्षेत्रांत राहणाऱ्या मतदारांसाठी वेगळी मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार आहेत.
८. मार्गदर्शक तत्वांनुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध होणार आहे.
९. प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराबरोबर केवळ दोन व्यक्तींना परवानगी असेल.
१०. घरोघर प्रचारासाठी जाताना उमेदवारासह केवळ पाच जणांना परवानगी असेल. त्यामध्ये सुरक्षारक्षकांचा समावेश करण्यात आलेला नाही.
११. सार्वजनिक सभा आणि रोड शोसाठी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे लागेल.
१२. सभा होणाऱ्या मैदानांवर आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. तिथे सोशल डिस्टन्सिंगची निश्‍चिती करण्यासाठी खुणा केल्या जातील.
१३. मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा जवानांना मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड आणि हातमोजे पुरवावे लागणार आहेत.
१४. केंद्रीय गृह आणि आरोग्य मंत्रालयांनी याआधी जारी केलेल्या नियमवालींचा आधार निवडणुकांची आणि मतदानाची प्रक्रिया पार पाडताना घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *