कोरोना लसीचे दुष्परिणाम, CDS ने दिल्या या सूचना..!

| मुंबई | कोरोनानं थैमान घातलेल्या अमेरिकेमध्ये अखेर दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. आपातकालीन वापरासाठी लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर लसीकरणही सुरू झालं आहे. मात्र, लस घेतल्यानंतर नागरिकांवर लसीचे दुष्परिणाम झाला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनने (रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र) तातडीनं पावलं उचलत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

अमेरिकेमध्ये फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या करोना लसींना परवानगी देण्यात आली आहे. आपातकालीन वापरासाठी ही परवानगी देण्यात आलेली असून, अमेरिकेत लसीकरणही सुरू झालं आहे. लसीकरण सुरू असतानाच चिंतेत भर घालणारी घटना समोर आली. करोना लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले. अलास्का राज्यात ही घटना घडली.

लस घेतल्यानंतर अॅलर्जीसारखा त्रास जाणवू लागला आहे. लसीकरणामुळे दुष्परिणाम झाल्याचं निर्दशनास आल्यानंतर अमेरिकेच्या रोग प्रतिबंध व नियंत्रण केंद्रानं (सीडीएस) तात्काळ मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लस घेतल्यानंतर दुष्परिणाम झालेल्या व अॅलर्जीचा त्रास असणाऱ्या नागरिकांना लस घ्यावयाच्या खबरदारीबद्दलसूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या व्यक्तींना लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे त्रास सुरू झाला आहे. त्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊ नये, असं सीडीएसनं स्पष्ट केलं आहे. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला अॅलर्जीपासून संरक्षण करणारे औषध देण्यात आले आणि त्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासारखी परिस्थिती उद्भवल्यास या प्रकरणाला गंभीर समजले जाईल. ज्या व्यक्तींना लसीमुळे अॅलर्जी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना लसीकरणापासून दूर ठेवण्याचे निर्देश सीडीएसने दिले आहेत.

मॉर्डना लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर शनिवारपासून लसीकरणाला सुरूवात झाली. त्याचबरोबर सोमवारी ३ हजार ७०० ठिकाणी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. मॉर्डनाच्या लसीआधी फायझर बायोएनटेकच्या लसीला ११ डिसेंबर रोजी परवानगी देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *