कल्याण पूर्व परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासाठी नगरविकास विभागाकडून ५ कोटी निधी मंजूर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश..!

| कल्याण | प्रत्येक भारतीयांच्या हृदयात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अढळ आहे, त्याचअनुषंगाने भारतीय संविधानाचे जनक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा पूर्णाकृती स्मारक कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील “ड” प्रभाग क्षेत्र कार्यालयाशेजारी उभारण्यासंबधी ३ डिसेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्त यांचे समवेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्यासंबधी चर्चा करण्यात आली; तसेच “ड” प्रभाग क्षेत्र कार्यालयाशेजारी भूखंड उपलब्ध असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा आरक्षण फेरबदल करण्याचे हरकती सूचना काढण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेमार्फत संबधितांना देण्यात आले असून सदर प्रक्रिया सुरु आहे. तसेच यासाठी लागणारा रु. ५.०० कोटी निधी नगरविकास विभागाकडून मंजूर करून आणण्यासाठी खा.डॉ. शिंदे हे स्वतः पाठपुरावा करीत असून त्यांना यश प्राप्त झाले आहे.

तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील “ड” प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरात परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक समाजाला त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. अन्यायग्रस्त वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची व जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल हा उद्धीष्ठ समोर ठेवून उभारण्यात येणार आहे असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शासनाकडून सदर प्रस्तावास मंजुरी मिळाली असून प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिकेकडून लवकरच शासनाकडे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्यात येणार असून भविष्यात अजून निधीची आवश्यकता असल्यास निधी उपलब्ध करून घेण्यात येईल असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. तसेच समस्त कल्याणकरांच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *