कल्याण एपीएमसीमध्ये फक्त घाऊक बाजार सुरू राहणार..!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्णय, किरकोळ विक्रीसाठी पाच ठिकाणे निश्चित..!

कल्याण / प्रतिनिधी- ग्राहकांची उडणारी झुंबड लक्षात घेता कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ मार्केट (रिटेल) बंद करण्याचा आज निर्णय घेण्यात आला. फक्त घाऊक (होलसेल) बाजार सुरू राहणार असून शेतकरी, ग्राहक, व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कल्याणमध्ये पाच ठिकाणी दररोज किरकोळ भाजीपाला विक्री केंद्र सुर रहाणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, डीसीपी विवेक पानसरे, एपीएमसी सभापती कपील थळे यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी संपूर्ण व्यवहार बंद असले तरी जिवनावश्यक वस्तूंची अडचण भासू नये म्हणून बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र धान्य, भाजीपाला खरेदीसाठी कल्याण बाजार समितीमध्ये ग्राहकांची झुंबड उडत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन आजच्या बैठकीत किरकोळ मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. एपीएमसीमध्ये फक्त घाऊक बाजार सुरू ठेवून किरकोळ भाजी खरेदीसाठी कल्याणमधील पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली. कल्याणमधील सुभाष मैदान, मॅक्सी ग्राउंड, फडके मैदान, वायले मैदान, डोंबिवली ९० फूट रोड या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. गरज वाटली तर आणखी बारा ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये डोंबिवली, टिटवाळा तसेच २७ गावांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *