कोविड योद्धे यांचा सत्कार करून, अनोख्या पद्धतीने रौनक सिटीत स्वातंत्र्यदिन साजरा..!

| कल्याण | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाच्या संकटामुळे नियमांना धरून काही छोटे कार्यक्रम देखील बऱ्याच ठिकाणी राबविले गेले. त्या नुसारच कल्याण येथील रौनकसिटी सेक्टर ३ ने नेहमीप्रमाणेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्याचा सण साजरा केला.

या वर्षी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता येथील रहिवाशांनी सर्व शासकीय आणि सामाजिक नियमांचे पालन करत आदर्श कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरच्या कार्यक्रमाचे फेसबुक तसेच गूगल मीट वर थेट प्रक्षेपण करण्यात आले. दरम्यान, अग्निशमन विभागात कार्यरत कांतीलाल गुजर या कोरोना योद्धाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण नंतर रौनकसिटी सेक्टर ३ मधील वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये कार्य करणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रौनकसिटी सेक्टर ३ मध्ये सेवा देणारे स्वच्छता सेवक आणि सुरक्षा रक्षक यांचा आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

या संकटकाळात आपल्या जीवाची बाजी लावून कोविड योद्धे म्हणून कार्यरत असणाऱ्या रहिवासी नागरिकांचा सत्कार करून या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेत, आपली समाजाप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिदास मोरे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वेद तिवारी, संतोष पांडे, संकेत जडयाल, संजय डांगे, चेतन कोळवणकर, किरण माने, स्वप्निल कांबळे, महेश सराफे, जयेश बजाज, स्वानंद हटकर, विनायक मगदूम आणि श्री.अजिंक्य सेठ यांनी महत्वाची भूमिका बजावली.

✓ मी गेली ५ महिने सततची सेवा कोविड योद्धा म्हणून ठाणे मनपा क्षेत्रात देत आहे, त्या कामाचे, कष्टाचे चीज आज या सत्काराने झाले. अविरत सेवा देण्यासाठी बळ माझ्या परिवाराने मला दिले , हे नक्कीच अभिमान वाढवणारे असेच आहे.
– विकास चव्हाण , कोविड योद्धा , स्थानिक रहिवासी.

✓ घरातील सर्व कामे उरकून दिवसभर कोविड योध्या म्हणून राष्ट्रीय कर्तव्य मी निभावले. आज या स्वातंत्र्यदिनी आमचा सर्वांचा सत्कार करून रौनक परिवाराने जो आदर दिला त्याने मन प्रफुल्लित झाले.
– सुजाता पाल, कोविड योद्धा, स्थानिक रहिवासी.

Leave a Reply

Your email address will not be published.