कोविड-19 च्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मदनवाडीमध्ये “कोरोना योद्धा” सन्मानपत्र देऊन सत्कार..

| इंदापूर / महादेव बंडगर | कोरोना महामारीच्या जागतिक संकटाने संपूर्ण जगाला घेरलेले असतानाही धीरोदात्तपणे या संकटाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, महावितरणचे कर्मचारी, भिगवण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचा नेहरू युवा केंद्र आणि मदनवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने शनिवारी (दि.24 सप्टेंबर) “कोरोना योद्धा सन्मानपत्र” देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प सदस्य हनुमंतराव बंडगर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. आम्रपाली बंडगर होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नेहरू युवा केंद्राचे इंदापूर तालुका स्वयंसेवक अजिनाथ बंडगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व नेहरू युवा केंद्राच्या वतीने “युवा मंडळ विकास कार्यक्रम”या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले .त्यानंतर विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी यांना “कोरोना योद्धा” हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी तक्रारवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मृदुला जगताप यांनी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या उपक्रमाची माहिती उपस्थितांना सांगितली. त्यानंतर अशोक मोरे, दिलीप बनकर, सिमा मारकड या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी डॉ. विशाल कोठारी, उपसरपंच तेजस देवकाते, सरपंच सौ. आम्रपाली बंडगर, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच अजिनाथ सकुंडे, आरोग्यसेवक श्री.शरद ससाणे, महिला व बालकल्याण विभागाचे संरक्षण अधिकारी शेखर बंडगर, मुख्याध्यापक संजय बंडगर व विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सर्वच मान्यवरांनी उपस्थित सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून अतिशय आत्मविश्वासाने व सेवाभावीवृत्तीने सर्व जनतेची सेवा केली. ते कार्य खूपच अतुलनीय आहे. त्याबद्दल सर्वांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. तसेच या कार्याची जाणीव ठेवून सर्व कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नेहरू युवा केंद्र आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचेही खूप कौतुक केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कुंडलिक भाऊ बंडगर, तेजस देवकाते, प्रवीण बंडगर, विजय निकम, बापू मत्रे, श्री गणेश मित्र मंडळ मदनवाडी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव बंडगर यांनी केले. आभारप्रदर्शन अजिनाथ बंडगर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *