कहाणी पुण्यातील ” मोदी ” गणपतीची..!

पुण्यातील ऐतिहासिक मंदिरात नारायण पेठेतील मोदी गणपती ह्या मंदिराचा समावेश होतो. ह्या मंदिराच्या नावात ज्या ` मोदी ` नावाचा उल्लेख आहे त्या मोदी व्यक्तीची माहिती प्रस्तुत करत आहे.

ह्या मोदीचे संपूर्ण नाव खुर्शेटजी मोदी असून तो दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत होऊन गेला. त्याचा जन्म इ.स.१७५५ मध्ये खंबायत ( गुजरात ) मध्ये झाला होता. पुण्याच्या इंग्रज रेसिडेंट म्यालेटची तो सुरतेस असल्या पासून खुर्शेटजी बरोबर ओळख होती. म्यालेटची पुण्याला बदली झाल्यावर त्याने मोदीला पण आपल्या बरोबर पुण्याला आणून आपल्या हाताखाली ठेवले.त्यावेळी पुण्याला ब्यारी क्लोज म्हणून इंग्रज रेसिडेंट होता. त्याचा मोदीवर खूपच विश्वास बसल्याने मोदी रेसिडेंट च्या वतीने मराठी कारभारी, सरदार, मुत्सद्द्यांकडे बोलणी करावयास जात असे. मोदीच्या रेसिडेंट बरोबर असलेल्या जवळीकीचा उपयोग करून मराठी मंडळी पण आपला कार्यभाग साधून घेत असत. ह्याच काळात बाजीरावकडे सदाशिव माणकेश्वर हा सल्लागार व बयाजी नाईक म्हणून एक हुजऱ्या होता. मोदी, माणकेश्वर आणि नाईक हे त्रिकुट त्या काळात सत्ता वर्तुळात खूप मोठे प्रस्थ बनले होते. हे तिघे जण जवळपास डबल एजंट म्हणून काम करत होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. तिघांनीही साहेबाचा निरोप म्हणून श्रीमंतांस सांगावे, श्रीमंतांची मर्जी अमुक आहे म्हणून साहेबाकडे सांगावे. अशा रीतीने पुष्कळ लोकांस खराब करून त्यांनी लाखो रुपये मिळविले…’

सन १८११ मध्ये क्लोस च्या जागी एल्फिन्स्टन पुण्याला रेसिडेंट म्हणून आला. क्लोस एकतंत्री व सरळमार्गी होता तर एल्फिन्स्टन पाताळयंत्री असून त्याला स्थानिक भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यामुळे त्याला स्थानिकांच्या भानगडी, गाऱ्हाणी, बातम्या समजावून घेण्यासाठी दुसऱ्यांच्या मदतीची आवश्यकता भासत नसे. एल्फिन्स्टन मोदीला चांगलाच ओळखून होता. त्यामुळे त्याने आल्यावर मोदिसारखे मध्यस्थ सत्ता वर्तुळातून दूर केले. त्यामुळे मोदी नाराज होऊन त्याने त्रिंबक जी डेंगळे बरोबर सुत जमवले. मोदीने बाजीरावास त्रिंबक जी मार्फत इशारा पण दिला होता कि , ‘’ आज पावेतो साहेब लोकांची चाल होती तशी एल्फिन्स्टन ची नाही.त्यांशी जाबसाल करणे तो सांभाळून करीत जावा… आपले ठिकाणी मजबुदीने राहावे म्हणजे त्यांचा इलाज चालणार नाही. आपला माझा अंतःकरणा पासून लोभ आहे म्हणून हे सुचवितो..’’

मोदीने बाजीरावबरोबर संधान साधल्याची खबर एल्फिन्स्टन ला मिळाल्यावर त्याने मोदी स खडसावले कि एकीकडे रेसिडेंट ची व दुसरीकडे बाजीरावची , अशा दोन नोकऱ्या तुम्ही करतात ते बरोबर नाही. तेव्हा मोदी ने बाजीराव्ने त्याला दिलेली कर्नाटकची सुभेदारी सोडून दिली, पण बाजीराव बरोबर गुफ्तगू चालूच ठेवले. त्रिंबक जी व मोदी हि जोडगोळी बाजीरावाची अतिशय विश्वासपात्र मंडळी बनली. बडोद्याहून गायकवाड यांच्या कडून पुण्याला चर्चेला आलेल्या गंगाधर शास्त्रीच्या कामात बिघाड करण्याचा बाजीरावला सल्ला मोदीने च दिला होता. त्यामुळे बाजीरावने गंगाधर शास्त्र्यांस कित्येक महिने झुलवत ठेवले व शेवटी पंढरपुरास रहस्यमय रित्या त्याचा खून झाला. फौजेचा जोर असल्यावर इंग्रज नरम पडतात असे मोदीने बाजीरावास पटवल्याने बाजीराव जास्त फौज बाळगू लागला.

मोदी व त्रिंबक जी यांची जोडगोळी बाजीरावपासून दूर केल्याशिवाय आपले डावपेच सहजासहजी यशस्वी होणार नाहीत याची एल्फिन्स्टन ची खात्री झाली. त्यादिशेने त्याने प्रयत्न सुरु केले. गंगाधर शास्त्र्यांच्या हत्येत त्रिंबक जी डेंगळे न चा हात असल्याचे त्याने बाजीरावास सांगून त्यासाठी त्रिंबक जी स आपल्या ताब्यात देण्याची बाजीरावकडे मागणी केली. बाजीराव साठी एल्फिन्स्टन ने अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली होती कि त्रिंबकजीना इंग्रजांच्या हाती सोपविणे बाजीरावला भाग पडले. एलफिस्टन ने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुमती घेऊन मोदीला दरमहा पांचशे रुपये निवृत्ती वेतन देऊन गुजरात मध्ये आपल्या गावी जाऊन राहण्याचा हुकुम दिला.आपली अवहेलना, मानहानी झाल्याचे मोदी स वाटून पुण्यातून जायच्या दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारी १८१५ ला त्याने रात्री विष प्राशन करून जीव दिला. नक्की मोदीने स्वतःच विष घेतले कि अन्य कुणी विषप्रयोग केला याचा छडा लावण्याचा एल्फिन्स्टन ने खूप दिवस प्रयत्न केला पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही.. गंगाधर शास्त्र्यांच्या खुना प्रमाणे.

पुण्यात मोदीचा बंगला व बाग होती. त्या बागेत एक गणपती पण होता. ह्याच गणपतीचे मंदिर तेव्हापासून मोदी गणपती म्हणून ओळखले जाते. आजचे मोदी गणपती मंदिर बांधण्याशी मोदीचा काही संबंध नाही, फक्त त्यातील मूर्ती त्याच्या बागेत होती. तिथे ति कुठून आली, मोदीने आणली होती कि आधी पासूनच तिथे होती याविषयी माहिती उपलब्ध नाही.

संदर्भ: मराठी रियासत..खंड ८.

– प्रकाश लोणकर, डोंबिवली

Leave a Reply

Your email address will not be published.