
| मुंबई | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’चा आदर्श महापालिकेने जगासमोर ठेवला. त्यानंतर, आता प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती चक्क गुगल मॅपवर उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्रात आहे का? असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे? हे नागरिकांना समजणे सोपे होणार आहे.
नुकतीच ही सुविधा सुरू झाली असून वेळोवेळी ती अद्ययावत केली जाईल, अशी माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. पालिकेच्या संकेतस्थळावरून मुंबईतील २४ विभागनिहाय नकाशांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्र दर्शविण्यात येतात. प्रत्येक नागरिकाला एका क्लिकवर आणि सोप्या पद्धतीने त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने पालिकेने गुगल मॅपची मदत घेण्याचे ठरवले. गुगलला ही कल्पना आवडल्याने त्यांनी गुगल मॅपवर प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखित नकाशे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. ही माहिती उपलब्ध करण्यास गुगलने महापालिकेकडून मोबदला घेतलेला नाही. गुगल सर्च इंजीनमध्ये मुंबई कोरोना व्हायरस अपडेट्स असे टाइप करताच पालिकेच्या संकेतस्थळावरून सोशल मीडियावर प्रसारित होणारी माहिती दिसते. इतर शहरांच्या प्रशासनानेही गुगलसोबत मिळून याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे.
मोबाइलवर गुगल मॅप हे अॅप्लिकेशन सुरू केल्यानंतर ‘कोविड-१९ इन्फो’ पर्याय निवडा. त्यानंतर, मुंबई महानगराचा नकाशा ‘झूम’ करून पाहताना प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात व कोविड-१९ कंटेनमेंट झोन या उपशीर्षकासह दिसतील. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकेल. तसेच ‘कोविड-१९ इन्फो’ निवडल्यानंतर बृहन्मुंबई महापालिका या पर्यायावर क्लिक केले, तर पालिकेच्या संकेतस्थळावर ‘स्टॉपकोरोनाव्हायरस डॉट एमसीजीएम डॉट गव्ह डॉट इन’ या पृष्ठावर कोरोनाविषयक संपूर्ण माहिती पाहता येते. जीआयएस आणि जेनेसीस यांचाही या उपक्रमाला हातभार लागला आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!