| मुंबई | महाराष्ट्राची राजधानी मुंबईला ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना आपल्यातल्या घरभेद्यांकडून बळ दिलं जात आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामनाच्या ‘रोखठोख’ या सदरातून त्यांनी कंगना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या लेखात संजय राऊत म्हणतात की, मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहे. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अपमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली तेव्हा महापालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊत यांनी म्हटलं आहे की, मुंबई विरोधात ६०-६५ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने भगवा झेंडा फडकवला. भाजपचे एक प्रमुख नेते आशिष शेलार यांचे असे म्हणणे आहे की ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे.’ भाजप नेत्यांचा इतिहास कच्चा आहे, असंही ते म्हणाले.
ते म्हणाले की, एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध एकेरी भाषा बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राम मंदिरच होते असा कांगावाही तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करुन ती सांगत असलेल्या पाकिस्तानात बांधले. मुंबईला ‘पाकिस्तान’ म्हणायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिक स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबईचा अवमान होत असताना खाली मान घालून बसतात?
कंगनाच्या मुंबईबाबत वक्तव्यावर मौन बाळगणाऱ्यांवर बोलताना राऊत म्हणाले की, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरुन अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. मुंबई महाराष्ट्राच्या बापाची आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड
राऊत यांनी लिहिलं आहे की, ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .