गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा – किरीट सोमय्या

| मुंबई | सुशांतसिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भाजप आक्रमक झाली आहे. सीबीआय चौकशीला नकार देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपनं केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सुशांतसिंह प्रकरणावरून देशभरात राजकीय गदारोळ सुरू आहे. या प्रकरणाशी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. तसंच, मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारनं त्यास ठाम नकार दिला होता. या प्रकरणात प्रत्येक वेळी बाजू मांडताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं करत आहेत. सीबीआय तपासाची गरज नाही, असं देशमुख यांनी वेळोवळी स्पष्ट केलं होतं. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपनं देशमुख यांनाही घेरलं आहे.

‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सुशांत प्रकरणात तब्बल दोन महिने साधा एफआयआर नोंदवून न घेणं हे दुर्दैवी आहे. ह्याची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

‘सुशांतच्या कुटुंबालाचा गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. ठाकरे सरकारची दादागिरी आता संपेल. हे सरकार आतातरी धडा घेईल,’ असं सांगतानाच, ‘सुशांतसिंहच्या कुटुंबाला न्याय मिळेल,’ असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *