घरगुती अत्याचारात वाढ, महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल..!

| मुंबई | राज्यात वेगवेगळ्या शहरात महिलांवरील घरगुती अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात महिलांवरील अत्याचारात राज्य महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात राज्य महिला आयोगाकडे आतापर्यंत राज्यभरातून एकूण एक हजार 304 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कौटुंबिक वाद व शारीरिक अत्याचाराच्या 397 तक्रारी आल्या असून यात तब्बल 389 प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. महिलांच्या सामाजिक समस्यांबाबत 376 तक्रारी राज्य महिला आयोगाकडे आल्या असून यात 368 तक्रारींवर कारवाई झाली आहे. संपत्ती विषयी 99 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामधील 92 प्रकरणं निकालात काढली आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या 33 तक्रारी आल्या असून राज्य महिला आयोगाने यातील 29 प्रकरणांत कारवाई केलीय. कामाच्या ठिकाणी 108 महिलांनी छळ होत असल्याचे सांगितले.

या संबंधी दाखल करण्यात आलेल्या तक्रांरीमध्ये 102 प्रकरणे निकाली काढली आहेत. राज्य महिला आयोगाकडे यासोबतच 291 विविध प्रकरणातील तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात 283 प्रकरणात राज्य महिला आयोगाने कारवाई केली आहे. एनसीआरबीच्या अहवालात 2019 सालात महिलांसंदर्भातील सर्व गुन्ह्यांबाबत देशातील विविध शहरांची आकडेवारी जाहीर झाली असून यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई देशात दोन क्रमांकावर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून दुस-या स्थानी मुंबई, तिस-या क्रमांकावर बंगळूरू शहर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.