चक्क आमदाराने धुतले बँक मॅनेजरचे पाय..! प्रचंड व्हायरल होतोय हा गांधीगिरीचा व्हिडिओ..!

| बीड | भाजपचे एक आमदार यांचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदार महोदय आष्टी( जिल्हा बीड) येथील एसबीआय बँकेचे मॅनेजर हरी नारायण यांचे पाय धुताना दिसत आहेत. हरी नारायण यांनी पीक कर्जाच्या काही फाईल मंजूर केल्या नाहीत. त्यामुळे या आमदाराने बँक मॅनेजरला आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचे पाय धुतले. यावेळी त्यांनी बँक मॅनेजरवर फुलांचा वर्षांव करत खांद्यावर उपरणं ठेवलं.
हे आमदार आहेत भाजपचे आमदार सुरेश धस..

सुरशे धस ‘मुन्नाभाई एमबीबीएम’ या चित्रपटाचं नाव घेत आपण गांधीगिरीने बँक मॅनेजरची समजूत घालत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मॅनेजर मिळावे, असं उपरोधिक वक्तव्य धस यांनी केलं. त्याचबरोबर आष्टीतील शेतकऱ्यांनीदेखील अशीच पूजा करावी, असंदेखील ते व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून बँक मॅनेजरला घरी बोलावून त्याची पूजा करणे, अंगावर फुले टाकणे, टोमणे मारणे हा खरंच गांधीगिरीचा मार्ग आहे का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. ही गांधीगिरी आहे की दादागिरी? असादेखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सुरेश धस यांचे याअगोदरही अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ते नेहमी कोणत्यातरी कारणासाठी चर्चेत असतात. आपल्या गावरान ठसकेबाज भाषणासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत. जनतेने त्यांना कधी ढोली बाजा तर कधी ‘मै हूँ डॉन’ या गाण्यावर थिरकताना बघितलं आहे. यावेळी बँक मॅनेजरसोबतच्या व्हिडीओमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.