‘ चल निकल ले कंगना ‘ म्हणत व्यक्त झालेल्या रोषाने अखेर कंगना आली शुद्धीवर..!

| मुंबई | भान हरपून एकावर एक वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगना राणौतचा सूर अखेर बदलेला दिसून येत आहे. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असे सांगत तिने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ म्हटले आहे. याबाबत तिने ट्विट केले आहे. मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नव्या वादात अडकलेली अभिनेत्री कंगनाचा अखेर सूर मवाळ झालेला दिसून येत आहे. तिने मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. एक प्रकारे तिने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. गुंड आणि माफियांपेक्षा मला मुंबईची जास्त भीती वाटते, असे म्हणत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर आरोप केले. मुंबई, मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरातून कंगनावर टीकेची झोड उठली. त्यानंतरही कंगनाने ९ सप्टेंबर २०२० रोजी मुंबईत येणार आहे. मला अडविण्यात कोणाच्या बापात हिम्मत आहे, असे ट्विट करत विरोध करणाऱ्यांना खुले आव्हान दिले होते. मात्र, त्यानंतर राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातून तिच्यावर टीका होवू लागली. समाजमाध्यमांवर तिच्याविरोधात ट्रेंडही सुरु झाला. अनेक कलाकारांनी तिला खडेबोलही सुनावले. त्यानंतर तिचा सूर बदलेला दिसून येत आहे.

कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने दिला होता. तर, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे मत खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते. तसेच भाजपनेही कंगनाला पाठिंबा देण्याबाबत यू टर्न घेतला होता. तसेच सिनेक्षेत्रातील मंडळींनीही कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्राबद्द कृतज्ञता बाळगण्याचा सल्ला दिला होता. अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्ष टोकले होते.

मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिक कंगनाविरोधात रस्त्यावर उतरले होते. तिच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलनही सुरू केले होते. कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कंगनानेही सुरुवातीला थेट आव्हान दिले होते. मात्र, हा वाद अधिकच चिघळ्याचे लक्षात येताच तिचा नरमाईचा सूर दिसून आला आहे. तिने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ असा नारा दिला आहे.

तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभारी आहेत. माझ्या सर्वच ठिकाणच्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा हेतूबद्दल कोणालाही शंका नाही आणि माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दलचं माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणाऱ्या मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *