३ मे १९१३ कोणत्याही मराठी माणसासाठी अभिमानाची तारिख. या दिवशी दादासाहेब फाळके यांनी पहिला अस्सल भारतीय बनावटीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शीत केला. याच्या एक वर्ष अलिकडे दादासाहेब तोरणे यांनी १८ मे १९१२ रोजी याच चित्रपटगृहात पुंडलिक हा चित्रपट प्रदर्शीत केलेलला. मात्र हा चित्रपट लांबीने कमी असल्याने तसेच काही किरकोळ प्रक्रिया परदेशात झाल्याने काही प्रमाणात उपेक्षिला गेला. भारतीय चित्रपटसृष्टीचे हे दोन्ही जनक काही प्रमाणात तरी माहित असतील. मात्र या दोघांच्या आधी भारतात कार्टून फिल्मचे जनक म्हणावेत अशा एका घराण्याबद्दल क्वचित कोणाला माहिती असते. ते म्हणजे काचपट्ट्यांवर चित्र काढून त्यांच्या हालचालितून कथा सांगणारे, शांबरिक खरोलिका नावाचा कार्यक्रम करणारे महादेव पटवर्धन आणि त्यांच्या नंतर पटवर्धन बंधू- विनायक पटवर्धन आणि रामचंद्र पटवर्धन.
३० सप्टेंबर १८९२ रोजी शांबरिक खरोलिकाचा पहिला प्रयोग झाला. त्याच्या पूर्वी पटवर्धन १८८४-८५ या काळात पटवर्धनांच्या घरी पाहुण्यांसमोर याचे खेळ होत असत.
✓ काय आहे शांबरिक खरोलिका?
याला इंग्रजीत मॅजिक लॅण्टर्न असं नाव आहे. यात कथानकातील सर्व पात्रं, कथेनुसार- प्रसंग ४ गुणिले ४ च्या काचेच्या पट्ट्यांवर काढले जात. प्रत्येक पारदर्शिकेचे दोन भाग असत. एक काचपट्टी घट्ट बसवलेली असे. तिच्यावर एका तऱ्हेने आरेखन केले जाई. त्याच्याच दुसऱ्या पट्टीवर ज्या भागाची हालचाल दाखवायची आहे, त्यानुसार आरेखन केले जाई आणि पहिल्या पट्टीवरील तो भाग झाकला जाई. सैल बसवलेली पुढची काच हलवली की चित्रातील पात्रे हालचाल करत असल्याचा भास निर्माण करता येई. याशिवाय देखाव्याची एक पट्टी रंगवलेली असे. शांबरिक खरोलिका तीन कंदिलांच्या सहाय्याने केला जाणारा खेळ होता. मधल्या कंदिलासमोर देखाव्याची एक पट्टी कायमस्वरूपी ठेवून इतर दोन कंदिलांसमोर प्रसंगानुरूप काढलेल्या हालचाल करणाऱ्या पट्ट्या असत.
शांबरिक खरोलिकाचा खेळ चालू असता तो मॅजिक लॅण्टर्न चालवणाऱ्याचं महत्त्वाचं काम म्हणजे सुसंगत क्रमांकानुसार पारदर्शिका पडद्यावर परावर्तित करणं आणि योग्य समयी पारदर्शिकेत बसवलेल्या दुसऱ्या कांचेची हवी तशी, हवी तितकीच हालचाल करत चलतचित्राचा आभास पडद्यावर निर्माण करणं.
✓ शांबरिक खरोलिकाचे दौरे आणि प्रसिद्धी :
३० सप्टेंबर १८९२ या दिवशी शांबरिक खरोलिकाचा पहिला जाहिर कार्यक्रम झाला. याच दिवशी मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून न्या. काशिनाथ वि. तेलंग यांची नियुक्ती झाली होती. पहिल्या नेटिव्ह उपकुलगुरूच्या स्वागतसमारंभाप्रीत्यर्थ हिंदू युनियन क्लबनं कार्यक्रम ठेवला होता. यावेळी समाजातल्या बुध्दिमंत व प्रतिष्ठित लोकांसमोर पटवर्धन यांनी आपला शोध दाखवला. दोन तास चाललेल्या या प्रयोगाने सर्व उपस्थित बेहद्द खुश झाले. त्यानंतर पटवर्धनांनी अनेक ठिकाणी, विविध प्रसंगी कार्यक्रम केले. कीर्तिकर, न्यायमुर्ती रानडे, मा. याज्ञिक, नामदार विठ्ठलदास करसनदास, त्रिभुवनदास मंगलदास, विठ्ठलदास ठाकरसीस, डॉ. भाटवडेकर, बाबा महाराज इ. लोकांनी हा कार्यक्रम पाहिला.
२७ डिसेंबर १८९५ साली पुण्यात राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात शांबरिक खरोलिकांचा एक खेळ झाला होता. लोकमान्य टिळक, स्वागताध्यक्ष भिडे, कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी, श्रीधर विठ्ठल दाते, नामदार गोखले, न्या. रानडे अशांसारख्या थोर नेत्यांनी महादेवरावांच्या कल्पकतेला शाबासकी दिली. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याने देखील हा खेळ ७ मे १९०९ रोजी पाहिला आणि कौतुकाचं प्रशस्तिपत्रकही दिलं. पटवर्धनांच्या शेषशायी भगवान रामपंचायतन या कलाकृती अमेरीकेतही गेल्या मात्र खरोलिकेचा प्रयोग काही तिकडे होऊ शकला नाही. दादासाहेब फाळके, सर्कसवाले छत्रे यांनीदेखील हे खेळ १९०९ मध्ये पाहिले होते.
✓ पटवर्धनांबद्दल थोडक्यात :
पटवर्धन घराणे मुळचे गुहागरचे. पेशवे काळात ते नागपूरकर- भोसले दरबारी होते. पेशवाईच्या अस्तानंतर गोपाळराव पटवर्धन कल्याणला भिक्षूकी करता स्थायिक झाले.
शांबरिक खरोलिकाचे उद्गाते महादेव गोपाळ पटवर्धन यांना चित्रकला, निरनिराळ्या रांगोळ्या, लोकरीवरचा काशिदा इ. कलांत गती होती. स्रीगीतसंग्रह, धुळाक्षरं, नकल्या या विषयावर त्यांची पुस्तकं होती. त्यांना दोन पुत्र जे पुढे शांबरिक खरोलिकांमध्ये पटवर्धन बंधु नावाने प्रसिध्द झाले- विनायक महादेव पटवर्धन आणि रामचंद्र महादेव पटवर्धन. विनायकराव उत्तम चित्रकार होते. १८९० मध्ये ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथे शिकायला होते. शांबरिक खरोलिकांच्या काचपट्ट्या बनवणे, रंगवणे इ. सर्व कामांत त्याचा मोलाचा वाटा आहे. पटवर्धन बंधूंपैकी दुसरे रामचंद्र पटवर्धन, ज्यांना कल्याणचे गांधी म्हणून ओळखलं जात असे. दि.बा. मोकाशी यांच्या ‘संध्याकाळचं पुणं’ या पुस्तकात रामचंद्र पटवर्धन यांच्याविषयी लिहीले आहे. ते आधी रेल्वेत नोकरी करत असत नंतर ते फोटोग्राफी करू लागले. कल्याणमधील ते पहिले फोटोग्राफर होते. ते व्यंगचित्रकार देखील होते आणि तो रोज एक राजकिय व्यंगचित्र कापडाच्या फलकावर काढत. ती व्यंगचित्र खोचक व विनोदी असत. १९३० च्या आसपास खादीप्रसार, हरिजनांसाठी शाळा काढणं असं कार्य त्यांनी केलं. सानेगुरूजींच्या अध्यक्षतेखाली १९४८ साली त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नव्यानं नगरपालिकेनं एका रस्त्याला ‘रामभाऊ पटवर्धन’ असं नाव दिलं.
टीप : माझ्यासाठी अतिशय अभिमानाची बाब ही, की या रामचंद्र पटवर्धनांचा मी तिसरा वंशज, अर्थात ते माझ्या वडिलांचे आजोबाच.
– प्रणव पटवर्धन, कल्याण
संदर्भ:- ‘शांबरिक खरोलिका’- श्रीकांत पेटकर
- जागर इतिहासाचा : शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे !
- “जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”
- !… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…!
- एका झाशीच्या राणीची गोष्ट…
- जानु भिंताडा – पानिपत मधील आपल्या धन्याच्या एक इमानदार सेवक…!