जागर इतिहासाचा : गोष्ट गुप्तहेरांची – ब्लॅक टायगर’ (भाग २)

रवींद्रच्या कुटुंबियांना वाटायचं की आपला मुलगा दुबईत नोकरीनिमित्त आहे, कारण त्याने आपल्या कुटुंबियांनाही आपल्या कामाविषयी सांगितलं नव्हतं. मधल्या काळात रवींद्रच्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी, रवींद्र दुबईमार्गे भारतात येऊन भावाच्या लग्नाला हजर राहून पुन्हा दुबईमार्गे पाकिस्तानात गेला. पण ही रवींद्रची त्याच्या कुटुंबीयांबरोबरची शेवटची भेट ठरणार होती.

१९७९ ते १९८३ च्या काळात त्याने भारतीय संरक्षण विभागाला संवेदनशील माहिती पुरवून खूप मोठी मदत केली. त्याने पार पाडलेल्या ह्या धोकादायक कामिगीरीवरून त्याला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘ब्लॅक टायगर’ ह्या नावाने संबोधले. सारं काही नीट चाललेलं असताना, १९८३ साली R&AW ने इनायत मसिह नावाच्या एका गुप्तहेराला नबिला काही महत्त्वाचे कागदपत्र देण्यास पाठवले असता, पाकिस्तानी गुप्तचर विभागाने मसीहाला पकडले. बरेच अत्याचार सहन केल्यानंतर मसिहाने भारतीय हेर असल्याचे कबूल केले आणि त्याने नबीचंही गुपित फोडलं. पाकिस्तानी गुप्तचर विभागाने रचलेल्या सापळ्यात रवींद्र कौशिक उर्फ नबी शकीर अडकला.

जागर इतिहासाचा : गोष्ट गुप्तहेरांची – ब्लॅक टायगर’ (भाग १)

पुढची दोन वर्षे रवींद्र कौशिक यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले आणि १९८५ साली पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने रवींद्रला फाशीची शिक्षा सुनावली पण पुढे ती शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. भारतीय सरकारने आपल्याला सोडवून घ्यावे यासाठी रवींद्रने त्याच्या कुटुंबियांना छुपी पत्रे लिहिली, आपला मुलगा पाकिस्तानच्या कोठडीत आहे हे वाचून त्याच्या वडिलांना धक्का बसला, व त्यातून न सावरून तेव्हाच त्यांनी प्राण सोडले. परंतु तत्कालीन भारत सरकारने रवींद्र कौशिकशी संबंध नाकारले. पाकिस्तानच्या कारागृहात रवींद्रची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती, त्यात त्यांना क्षयरोग झाला व २००१ साली पाकिस्तानच्या सेन्ट्रल मुलतान कारागृहात त्यांचा देहान्त झाला.

तत्कालीन भारत सरकारने रवींद्र कौशिक यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत रवींद्र यांनी आपल्या पत्रातून खंत व्यक्त केली, परंतु त्याचबरोबर त्यांनी आपल्या कर्तव्याला जागून देशाची कोणतीही गुपीते कितीही अत्याचार झाले तरी फोडणार नाही असे लिहिले आणि खऱ्या अर्थाने रवींद्र कौशिक यांनी आयुष्याच्या रंगमंचावर निष्ठावान देशभक्ताची भूमिका निभावली. अशी व्यक्तिमत्वे पाहिल्यावर आठवतात त्या रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांच्या ओळी-

जय हो, जग में जले जहां भी, नमन पुनीत अनल को
जिस नर में भी, हमारा नमन तेज को बल को।।

समाप्त
– भारती परांजपे

संदर्भ

1. https://www.dawn.com/news/1334049

2. https://www.telegraphindia.com/1021230/asp/frontpage/story_1526967.asp

3. https://m.economictimes.com/news/defence/story-of-raw-agent-ravinder-kaushik-who-worked-as-a-pakistan-army-major/-the-greatest-spy-of-india/slideshow/58240718.cms

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *