जातीय आरक्षणासाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे.. – संजय राऊत

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. आरक्षणावरूनच संभाजीराजे यांनी तलवार काढण्याचा इशारा दिला होता. त्यावर शिवसेनेनं संभाजीराजेंना सवाल केला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती करू नये, नोकर भरतीसाठीच्या ‘एमपीएससी’सारख्या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपाचे राज्य सभेतील खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा व ‘वेळ आल्यास तलवारी काढू’, असा इशारा दिला होता.

“जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल. प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.’ कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही,” अशी भूमिका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मांडली आहे.

“सरकारच्या कानावर गेलं तरी पुरे…”

“आता ‘रेस्टॉरंट’ सुरू करताच पोलिसांनी हॉटेलवर धाडी टाकायला सुरुवात केली. गोरेगावच्या एका बारमध्ये ११ बारबाला नृत्य करतात. अशातच हा बार उशिरापर्यंत सुरू होता, असं पोलिसांचे म्हणणं आहे. ते खरं आहे, पण हा जो मोठा वर्ग याच व्यवसायावर जगत होता, तो सात-आठ महिन्यांपासून कसाबसा अर्धपोटी अवस्थेत जिवंत राहिला आहे. आता त्यांच्या रोजगार व पोटापाण्याची व्यवस्था सरकार किंवा प्रशासन करू शकेल काय? मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसं सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.