ज्या पक्षाला आपला अध्यक्ष ठरवता येत नाही तो, निर्णय काय घेणार – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचं काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लगावला. राज्य सरकारमधील कुरबुरी, काँग्रेसची नाराजी, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद यावरून फडणवीसांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भावी अध्यक्ष गांधी कुटुंबातील असावा की बाहेरील, यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. देशभरातील काँग्रेसचे नेतेही त्यांची मते मांडत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या नावाला ठाम पाठिंबा दिला आहे. वडेट्टीवार यांनी तर त्यांच्याही पुढे जाऊन अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितल्यास राज्यातील सत्ताही सोडू, असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यातील सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

वडेट्टीवारांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता, या सगळ्याकडे आता आम्ही फार लक्ष देत नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद सुरू आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदी राहायचे नाही. पण त्यांनाच राहावे लागत आहे. जे अध्यक्ष पदाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, ते पुढचे निर्णय कसे घेणार?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या पक्षाची अशी अवस्था का झाली याचे आत्मचिंतन करायला हवे, असेदेखील ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *