जर पराभूत झालो तर देश सोडून जावे लागेल – या राष्ट्राध्यक्षाच्या वक्तव्याने खळबळ..

| वॉशिंग्टन | अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर जो बायडेन डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक रिंगणात असून सध्या तेथील प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी येत्या तीन नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

आता मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणारे डोनाल्ड ट्रम्प भावनिक साद घालत आहेत. जो बायडेन यांच्याविरोधात माझा पराभव झाला, तर मला देश सोडावा लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. जॉर्जिया माकॉन येथील प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.

प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन यांच्यावर या प्रचारसभेत त्यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मी राष्ट्राध्यक्षीय राजकारणाच्या इतिहासात एका वाईट उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत असल्याचे ट्रम्प म्हणाले. अशा उमेदवाराविरोधात निवडणूक लढवताना तुमच्यावर दबाव येत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तुम्ही कधी कल्पना केली आहे का? माझा या निवडणुकीत पराभव झाला तर? माझा राजकारणाच्या इतिहासात एका वाईट उमेदवाराकडून पराभव झाला, असेच मी आयुष्यभर म्हणत राहीन. मला अजिबात चांगले वाटणार नाही. मला कदाचित देश सोडावा लागेल. मला पुढे काय घडणार, याची काहीच कल्पना नसल्याचे ट्रम्प म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *