जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यावेळी अनुपस्थित राहणे ग्रामसेवकाला पडले महागात; एक दिवसाची विनावेतन करून पदभारही काढून घेतला, इंदापूर गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई..

| इंदापूर / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.निर्मला ताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर हे गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी इंदापूर तालुक्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची, घरांची पडझड व शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व चालू असलेल्या पंचनाम्याची सद्यस्थिती पाहण्यासाठी इंदापूरला पाहणी दौऱ्यावर होते.या सर्व दौऱ्याची पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्यामार्फत ग्रामसेवकांना सूचना देण्यात आली होती. व आवश्यक ती माहिती घेऊन दौऱ्यावेळी उपस्थित राहणेबाबत पंचायत समितीने सूचना दिल्या होत्या.

परंतु लाकडी गावांमध्ये पाहणी केली असता या दौऱ्यादरम्यान सदर गावचे ग्रामसेवक श्री. डी. जे कुतवळ हे उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज सादर केलेला नव्हता वा दूरध्वनीद्वारेही संपर्क साधला नव्हता. त्यामुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांना लाकडी ग्रामपंचायत क्षेत्रातील नुकसानीबाबत आवश्यक ती मिळाली नाही. त्यामुळे याबाबत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

याची तात्काळ दखल घेत इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी ग्रामसेवक डी.जे कुतवळ यांना नोटीस काढली असून त्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील (वर्तणूक) नियम 1967 मधील तरतुदीनुसार सदर ग्रामसेवकाची एक दिवसाची विनावेतन करण्यात आलेली असून त्यांच्याकडील लाकडी ग्रामपंचायतीचा पदभार काढून घेण्यात आलेला आहे. अशी नोटीस बजावली असून पुढील आदेश येईपर्यंत पंचायत समिती कार्यालय इंदापूर येथे हजर राहण्याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. या कारवाईमुळे प्रशासनाने कामचुकार कर्मचाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. असेच वर्तन राहिल्यास कर्मचाऱ्यांना भविष्यात कठोर कारवाई ला सामोरे जावे लागेल.

✓ “आपत्कालीन संकटप्रसंगी कर्मचाऱ्यांनी लोकभावना लक्षात घेऊन कामकाज केले पाहिजे. अतिवृष्टीमुळे सर्व प्रशासन पाहणी करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असताना कर्मचाऱ्यांचा हा निष्काळजीपणा म्हणजे बळीराजाशी प्रतारणाच आहे.”
– श्री. हनुमंतराव बंडगर, सदस्य जि. प. पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published.