टाटा, अंबानी, अदानी, बिर्ला, महिंद्रा, बजाज यांना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण..!

| नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आले होते. आता या आमंत्रितांमध्ये उद्योग जगतातील अनेक प्रसिद्ध हस्तींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

राम जन्मभूमी ट्रस्टकडून आमंत्रित करण्यात येणा-या यादीत अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश केला आहे. यामध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांसारख्या १० उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे.

येत्या ५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची रुपरेषाही जाहीर करण्यात आलीय. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राम जन्मभूमीवर उपस्थित होणार आहेत. ते नागरिकांनाही संबोधित करणार आहेत.

अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूमी पूजनाच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या उपस्थितांच्या यादीत ५० साधू-संत, ५० अधिकारी आणि ५० जण विश्व हिंदू परिषद आणि न्यासाशी संबंधित असतील. भूमी पूजनाच्या कार्यक्रमात देशातील ५० नेत्यांचाही समावेश असेल. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण धाडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *