ठाण्यातील सेनेच्या बड्या नेत्याच्या घरावर ED ची छापेमारी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची खेळी..?

| मुंबई/ ठाणे | मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आज, मंगळवारी सकाळी छापे मारले. सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील १० ठिकाणांची झाडाझडती घेण्यात येत आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत. ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात आज सकाळीच ईडीने त्यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापेमारी केली. मुंबईसह ठाण्यातील एकूण १० ठिकाणांची झाडाझडती घेतली जात आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं. याचाच वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *