ठाण्यात पक्षात एकाधिकारशाही, त्यामुळे मनसे शहर सचिवांचा राजीनामा..

| ठाणे | गेली १४ वर्षे पक्षात कार्यरत असणारे मनसेचे ठाणे शहर सचिव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निर्णय घेतल्याचे अनिल म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. याच कारणावरून डॉ. ओमकार माळी यांनीही राजीनामा दिला होता. आता त्यांच्यापाठोपाठ अनिल म्हात्रे यांनीही राजीनामा दिला आहे.

पक्षात एकाधिकारशाही वाढली असून एका विशेष गटाचे प्राबल्य वाढले आहे. १४ वर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांची घुसमट होत आहे. पक्षाच्या वाईट काळात आम्ही टिकून राहिलो, असे अनिल म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. अनिल म्हात्रे यांच्यासह दहा जणांनी या राजीनाम्यावर सही केली आहे. दरम्यान, अनिल म्हात्रे हे आमच्या पक्षातील प्रामाणिक मनसे कार्यकर्ते आहेत. त्यांची घुसमट समजून घेऊन पक्ष त्यांची नाराजी दूर करेल, असे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

गेले दीड वर्षांपासून मला आणि माझ्या सहकाऱ्यांना पक्षात त्रास होत आहे. पक्षात डावलणे, अपमानित करणे, हेतुपूर्वक टाळणे, अंतर्गत दबावतंत्र वापरणे हे सर्व प्रकार घडत आहेत. काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतात. लोकांची कामेही होत नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे अनिल म्हात्रे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *