डॉ अमोल कोल्हे यांच्या मागणीला गडकरींकडून हिरवा कंदील..

| पुणे | पुणे, अहमदनगर ते औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ या रस्त्याच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे काम भारतमाला परियोजना फेज-2 मध्ये घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार डीपीआरची तयारी केली जात असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शिरुरचे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पत्र पाठवून कळविले आहे. दरम्यान हे काम मार्गी लागल्यास नगर – पुणे महामार्गावरील वाहतूकीची कोंडी हटणार आहे.

सततच वाहतूकीची कोंडी असणाऱ्या पुणे-अहमदनगर रस्त्यावरील हा प्रश्न सोडविण्यासाठी वाघोली ते शिरुर पर्यंतच्या रस्त्याच्या सहापदरीकरण करण्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी कन्सल्टन्ट नियुक्त करण्याबाबत शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना मार्च महिन्यात पत्र पाठवले होते.तसेच नुकत्याच पार पडलेल्या संसद अधिवेशन काळात याचा पाठपुरावाही केला होता. डॉ. कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी पुणे – अहमदनगर – औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

“भारतमाला परियोजना” अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने जारी केल्या असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे -अहमदनगर ते औरंगाबाद हा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग म्हणून विकसित करणार असून केंद्राच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिल्यानंतर हा प्रकल्प हाती घेण्यात येईल असे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी खा.डॉ.कोल्हे यांना कळविले आहे.

या मतदारसंघात खासदारपदी निवडून आल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी सातत्याने पुणे -नगर, पुणे नाशिक तसेच तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे राजगुरुनगर ते आळेफाटा (पुणे जिल्हा हद्द) या दरम्यानची बाह्यवळण रस्त्यांची कामे मार्गी लागली असून आता त्यांनी पुणे नगर रस्ता, नाशिकफाटा ते चांडोली व तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गांच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे आगामी काळात पुणे -नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *