तक्रारवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे “जागतिक हृदय दिन” साजरा..!

| इंदापूर / महादेव बंडगर | दिनांक 29 सप्टेंबर रोजी “जागतिक हृदय दिन” प्राथमिक आरोग्य केंद्र तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथे साजरा करण्यात आला. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला जगताप यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 58 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

जागतिक पातळीवर हृदय दिन हा कौटुंबिक, सामाजिक, शासकीय पातळीवर साजरा केला जातो. जगामध्ये हृदयाच्या आजाराच्या संबंधाने मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या कोटींच्या घरात आहे. त्यामुळे हृदयरोगासंबंधीची जागरूकता सामान्य नागरिकांमध्ये वाढविणे गरजेचे आहे. सकस आहार व योग्य व्यायाम हे तुमच्या सुदृढ हृदयाची साथ देऊ शकतात असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ. जगताप यांनी केले. हृदयाच्या आजारामुळे वाढणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2025 पर्यंत कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसीज (CVD) मुळे वाढणारा मृत्युदर कमी करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट होते. अनेकांना कोणतेही श्रमाचे काम न करता दरदरून घाम येतो. तसेच महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅक ची कारणे ही वेगवेगळी असतात. मादक पदार्थांचे सेवन, लठ्ठपणा, अनुवंशिकता ही प्रामुख्याने आढळणारी कारणे असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असेही डॉक्टर जगताप यांनी याप्रसंगी सांगितले.

या कार्यक्रमासाठी तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शोभा वाघ, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या कोरोनाचा संकट काळ चालू असूनही कोविड केअर सेंटरची जबाबदारी असतानाही डॉ. मृदुला जगताप यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले आहे. परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यविषयक सेवासुविधा पुरवण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *