तब्बल ५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या लढ्यात रोहित पवार एन्ट्री करणार..?

| पुणे / विनायक शिंदे | १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन लढा देत आहे. या लढयासाठी कर्जत जामखेडचे आमदार व महाराष्ट्राचा युवा चेहरा रोहीत पवार यांचे पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना रद्द करून परिभाषित अंशदायी निवृत्ती योजना (डीसीपीएस ) लागू करण्यात आली. आता डीसीपीएस चे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत रुपातंर करण्यात येत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एनपीएस लागू करण्याची प्रक्रिया चालू आहे. जूनी पेन्शन योजना रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांना म्हातारपणात पेन्शनरुपी आधाराची काठी नसणार आहे. कुटूंब निवृत्ती वेतन योजना, उपदान, अनुकंपा लागू नाही , कर्मचाऱ्यांच्या मृत्यू पश्चात कुटूंबीयांची परवड होत आहे, अश्या अनेक प्रश्नांनी महाराष्ट्रातील जवळपास ५ लाख कर्मचारी अधांतरी भविष्यात गुरफटला आहे.

जूनी पेन्शन योजना लागू व्हावी, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांना न्याय देण्यासाठी गेली ५ वर्ष महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन संघर्ष करत आहे, लढा देत आहे. मुंबई, नागपूर, विविध जिल्हा स्तरांवर वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने, मोर्चे, उपोषण केले आहेत. राज्यपाल, पक्ष प्रमुख – नेते , राज्यातील आजी -माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांच्या वारंवार भेटीगाठी घेवून अर्ज विनंत्या करून प्रश्न कानावर घालण्यात आला आहे. परंतु व्यापक आणि सहजासहजी सुटणारा प्रश्न नसल्याने याकडे अधिक लक्ष दिले गेले नाही.

दरम्यान, आता आजच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार व महाआघाडीतील लक्षवेधी व प्रभावी नेते असलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जूनी पेन्शनच्या प्रश्नात लक्ष घालणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य माध्यम प्रमुख प्राजक्त झावरे पाटील, राज्य प्रवक्ते शिवाजी खुडे, उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष गदादे , सरचिटणीस वैभव सदाकाळ, सोमनाथ कुदळे आदींच्या शिष्टमंडळाने आज आमदार रोहित पवार यांची आज पुणे येथे भेट घेतली.

यापूर्वी जानेवारी व फेबुवारी मध्ये २ भेटी झाल्या. परंतु त्यात सविस्तर चर्चा झाली नव्हती. आज पुणे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे, प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ कुदळे यांच्या प्रयत्नाने पुन्हा भेट झाली. या भेटीत सविस्तर चर्चा झाली. त्यात सध्या सुरु असणाऱ्या एनपीएस वर्गीकरणाची गोंधळाची स्थिती बाबत देखील चर्चा झाली. त्या दृष्टीने रोहित पवार सचिवांशी चर्चा करणार असल्याची माहिती संघटनेचे प्राजक्त झावरे पाटील यांनी दिली आहे.

जूनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व कामकाजाचा लेखाजोखा सादरीकरण श्री. पवार यांच्याकडे करण्यात आले. एकंदरीत आढावा घेऊन सर्वोतोपरी सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका आमदारांनी घेतली असून सहकार्यासोबत मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असेही पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.