तबलिगी जमात पूर्णतः निर्दोष, चुकीच्या प्रकारे त्यांच्यावर आरोप केले..!

| मुंबई | दिल्लीतल्या निझामुद्दीन मरकजमध्ये मार्च महिन्यात एका कार्यक्रमात सहभाग नोंदवलेल्या २९ विदेशी नागरिकांविरोधातील FIR मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. या नागरिकांनी व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि इस्लामचा प्रसार केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. हे नागरिक देशात कोरोनाचा प्रसार करण्यास जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आदेशात म्हटलं आहे की, साथीचा रोग किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास सत्ताधारी नेहमीच बळीचा बकरा शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि पुरावे पाहिल्यास या विदेशी नागरिकांना बळीचा बकरा बनवल्याचं दिसून येतं.

न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे की, माध्यमांमध्ये मरकजमध्ये सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांविरोधात मोठा प्रपोगंडा चालवण्यात आला आणि हेच लोक कोरोनाचा प्रसार होण्यास जबाबदार आहे, असं चित्र निर्माण करण्यात आलं. व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करून तबलिगीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आरोप या विदेशी नागरिकांवर करण्यात आला होता. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमा, साथीचा रोग प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि विदेशी नागरिक कायदा या अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता.

औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे आणि एम.जी.सेवलिकर यांनी याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी केली. हे याचिकाकर्ते आयव्हरी कोस्ट, घाना, टांझानिया, जिबूती, बेनिन आणि इंडोनेशियाचे रहिवाशी आहेत.

दरम्यान, तबलिगी जमात अशा लोकांचा समूह जो अल्लाह आणि दीनचा प्रचार-प्रसार करतो. इस्लामच्या प्राचीन परंपरांना मानणारा हा समूह आहे. ‘मरकज’चा अर्थ आहे केंद्र आणि जमातचा अर्थ आहे समूह. तबलिगी जमात ही एक धार्मिक संस्था आहे. १९२६ सालापासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. इस्लामचे अभ्यासक मौलाना मुहम्मद इलियास यांनी ही संस्था स्थापन केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *