दिल्या घरी सध्या तरी खुश, वैभव पिचड यांच्या सध्या शब्दाने राजकीय चर्चेला उधाण..!

| अहमदनगर | भाजपचे नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या घरवापसीची चर्चा सुरु होती. यावर वैभव पिचड म्हणाले, “माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी सध्या तरी दिल्या घरी खुश आहे”. वैभव पिचड यांनी यावेळी ‘सध्या’ या शब्दाचा प्रयोग केल्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

वैभव पिचड म्हणाले, “काल परवा काही वृत्तवाहिन्यांनी ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते पुन्हा आधीच्या पक्षात परतणार असल्याच्या बातम्या दाखवल्या. यात माझाही फोटो दाखवून तसं सांगण्यात आलं. मात्र, मी अनेक वृत्तवाहिन्यांशी संपर्क करुन माझा खुलासा केला आहे. माझ्याशी अद्याप कुणाचा संपर्कही झालेला नाही. तसेच माझा सध्या घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. मी आहे त्या घरात सध्या तरी खुश आहे.”

माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांच्या घरवापसीच्या चर्चेवर वैभव पिचड यांनी सध्या तरी असा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय.

दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आमदार परत राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.