दिलासादायक : राज्यांतर्गत सुरू झालेली लालपरी आजपासून ओलांडणार राज्याच्या सीमा..!

| धुळे | राज्यात लालपरी धावू लागल्यानंतर अनेकांच्या मागणीवरून आजपासून एसटीची आंतरराज्य सेवा सुरू होणार आहे. सुरुवातीला महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत आहे. एसटीच्या धुळे विभागातून उद्यापासून धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत अशी आंतर राज्य बस सेवा सुरू होत आहे. यासाठीचं नियोजन एसटीच्या धुळे विभागाकडून करण्यात आलं आहे. एका सीटवर एकच प्रवाशी या प्रमाणे एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे.

प्रवाशांना एसटीत बसल्यानंतर देखील मास्कचा वापर करणं आवश्यक राहणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता टप्याटप्याने अहमदाबाद, बडोदा, तसेच मध्यप्रदेशसाठी देखील आंतरराज्य बस सेवा सुरू होणार आहे. हळूहळू सर्वच मार्गांवरील एसटीची सेवा सुरळीत सुरू होणार आहे. २३ मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. साधारण पाच महिन्यांच्या कालावधी नंतर एसटीची आंतरराज्य बस सेवा पुन्हा सुरु झालीय. २० ऑगस्ट पासून एसटीची आंतर जिल्हा बस सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर आता आंतर राज्य बस सेवा सुरु झाल्यानं एसटीची सेवा सुरळीत सुरु होत आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाचं राज्यशासनात विलनीकरण करावं या मागणीवर एसटी महामंडळाच्या २० संघटना मिळून तयार झालेल्या कृती समितीच्या पहिल्याच बैठकीत एकमत झालं. पुणे जिल्ह्यात झालेल्या कृती समितीच्या या पहिल्या वहिल्या बैठकीचा मुख्य अजेंडा एसटीचं राज्य शासनात विलनीकरण हाच होता, त्यावर एकमत झालं. कृती समितीच्या बैठकीस राज्य सरकारमध्ये असलेल्या शिवसेना तसेच काँग्रेस प्रणित संघटनांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. तर मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसह इतर १८ संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी या संयुक्त कृती समितीच्या बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *