नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांचे पारडे जड..? महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने जाहीर केला पाठिंबा..!

| नागपूर | नागपूर पदवीधर मतदारसंघावर आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवत संदीप जोशी यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यासाठीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने जोर लावला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमुळे २७ टक्के मतदार घटले, याचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भाजपच्या गडात ही निवडणूक होत असल्याने पक्षासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. भाजपने यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. कधी काळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भाजपचा गड असलेला मतदारसंघ खेचून आणण्यासाठी काँग्रेसनेही जोर लावला आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे अभिजीत वंजारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ते या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांना अनेक संघटनानी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातच नुकताच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना या महाराष्ट्रतील सर्वात मोठया सरकारी/निमसरकारी कर्मचारी संघटनेने देखील आपला पाठिंबा महाविकास आघाडीच्या या उमेदवाराच्या मागे उभा केला आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने पाठिंबा दिल्याने अभिजीत वंजारी यांचे पारडे जड मानले जात आहे.

“जुन्या पेन्शन योजनेचा लढा पुढे नेण्यासाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातून आम्ही महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ते हा प्रश्न सभागृहात लावून धरतील आणि सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतील असा विश्वास आम्हाला आहे. या पूर्वी देखील आम्ही अमरावती विभागातून शेखर भोयर यांना पाठिंबा जाहीर केला आहे,” असे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या निवडणूक प्रभारी सौ. गीता वितेश खांडेकर यांनी दैनिक लोकशक्तीशी बोलताना सांगितले आहे. तसेच लवकरच इतर शिक्षक व पदवीधर मतदार संघाबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.