नदीत अस्थी विसर्जन टाळून वृक्षारोपणाचा निर्णय; परबत पाटील कुटुंबियांचा आगळावेगळा आदर्श..

| सोलापूर : महेश देशमुख | सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अकोले बु. गावचे ३५ वर्षे सरपंचपद भुषविलेले माजी सरपंच शत्रूघ्न सुबराव परबत-पाटील यांचे रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८५ व्या अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर परबत-पाटील कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन शत्रूघ्न परबत-पाटील यांच्या अस्थी नदीत विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. अस्थी नदीत विसर्जन केल्याने जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. अस्थी बरोबर रक्षा नदीत विसर्जन केल्यानंतर रक्षा पाण्याच्या तळाला जाऊन पाणी जमिनीत मुरण्यासाठी अडथळा निर्माण होतो यासारख्या अनेक कारणांमुळे नदी प्रदूषित होते.

काल मंगळवारी तिसऱ्या दिवशी त्यांची रक्षा व अस्थी( हाडे )नदी किंवा विहिरीतील पाण्यात न टाकता त्यांच्या पत्नी श्रीमती केशरबाई परबत पाटिल, मुलगी मंदाकिनी भीमराव शेळके व मुलगा प्रभाकर परबत पाटील यांनी नातेवाईकांच्या समवेत त्यांच्या शेतात पाच झाडे लावून त्या खाली अस्थि व राखेचे विसर्जन केले.

या बाबत त्यांचे सुपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर परबत -पाटील म्हणाले की, मृत व्यक्तीवर अग्नी संस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याची रक्षा व अस्थी नदी किंवा विहिरीतील पाण्यात विसर्जीत केली जाते.

यामुळे पाणी दूषित बनते व पर्यावरणाला हानी पोहोचू शकते .ही रूढ पद्धत बंद करून पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून आम्ही परबत- पाटील कुटुंबीयांनी सर्वानुमते रक्षा विसर्जनाची नवीन वेगळी पद्धत सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या शेतात आमच्या वडिलांच्या अस्थी व रक्षा यांचे बेल, सीताफळ,पेरू,आंबा व चिंच या पाच झाडांचे वृक्षारोपण करून त्यांच्या बुडात विसर्जन केले आहे. यामुळे भविष्यकाळात या झाडापासून ऑक्सिजन मिळेल व भावी पिढीला फळेही मिळतील. या उपक्रमाचा प्रचार-प्रसार करणार असुन जनजागृतीही करणार असल्याचे प्रभाकर परबत- पाटील यांनी सांगितले, त्यांच्या या उपक्रमाचे सोलापूर जिल्ह्य़ातील अनेक सुज्ञ नागरिक व पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *