निमगाव केतकी कोविड सेंटर मधील औषध-गोळ्या चोरी प्रकरण तापण्याची चिन्हे; राजवर्धन पाटलांची मृत रुग्णांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये भरपाईची मागणी..

| इंदापूर/महादेव बंडगर | राजवर्धन पाटील यांनी आज (दि.23)निमगाव केतकी येथील श्री.बाबासाहेब भोंग यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावे, यासंदर्भात चर्चा केली. व या कोविड सेंटरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारने 25 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी राजवर्धन पाटील यांनी केल्याने हे प्रकरण आता चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

श्री. बाबासाहेब भोंग यांनी निमगाव केतकी कोविड सेंटर मधील गोळ्या औषधे चोरी प्रकरणी दि.21 ऑक्टोबर पासून उपोषण सुरू केले आहे. काल संध्याकाळी त्यांना उपोषणामुळे त्रास सुरू झाला. त्यांनी गेल्या महिन्यात अकलूजच्या इनामदार रुग्णालयात कोविड व न्यूमोनिया आजारावर उपचार घेतले आहेत. तसेच त्यांना शुगरचा त्रास होत आहे. उपोषणकर्ते श्री.भोंग हे अत्यंत प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न व सदैव लोकांच्या मदतीला धावून जाणारे आहेत, अशा वेळी उपोषणामुळे श्री.भोंग यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून मा. राजवर्धन पाटील यांनी त्यांनी उपोषण सोडावे म्हणून आग्रह धरला होता.

यावेळी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की, निमगाव केतकी कोविड सेंटरचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. कोविड सेंटरमधील गोळ्या-औषधे चोरीला गेले असतील, तर रुग्णांवर उपचार कसे झाले असतील. याची कल्पना करवत नाही. येथील कोविड सेंटरमध्ये झालेले मृत्यू हे चोरीला गेलेल्या औषध गोळ्या अभावी झाले आहेत. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निमगाव केतकी येथे उपचार घेत असताना मृत्यू पावल्या आहेत, त्या कुटुंबाला 25 लाखाची मदत शासनाने द्यावी ही मागणी अत्यंत योग्य असून या प्रकरणाची योग्य ती दखल न घेतल्यास पुढील काळात श्री. बाबासाहेब भोंग यांच्या बरोबर आम्हीही आंदोलन करू व पीडितांना न्याय मिळवून देऊ असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *