नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

| मुंबई |  नवीमुंबई येथील प्रस्तावित विमानतळाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे याकरिता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे.

दरम्यान, मुंबई विमानतळावरील बोजा कमी व्हावा म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करणे हे महत्वाचे मानले जात आहे. त्यामुळे मुंबई सारखे हेही गजबजलेले विमानतळ ठरणार आहे. त्यामुळे या अतिशय महत्वाच्या विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, ही मागणी मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान या मागणीला शिवसैनिकांकडून अतिशय उदंड प्रतिसाद मिळत आहे.

कसं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ?

✓ 1160 हेक्टर जागेवर 16 हजार कोटी रूपये खर्चून विमानतळ उभारलं जाणार आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये विमानतळाच्या कामाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे.

✓ सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन करून त्यांना 2014 च्या पुनर्वसन आणि पुनर्वसन स्थापना धोरण कायद्यानुसार नुकसान भरपाई आणि स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. एकूण 12 गावातील 3500 कुटुंबांपैकी सध्या 500 कुटुंबांचं इतरत्र स्थलांतरण करण्यात आलं आहे.

✓ सिडकोने विमानतळाचं काम युध्दपातळीवर हाती घेतलं असून 2 हजार कोटी रुपयांचं काम चार कंपन्यांना देण्यात आलं आहे. यामध्ये GVK Infrastructure, Gayatri Infra project, J M Mhatre , T J P L यांचा समावेश आहे. डोंगराचं सपाटीकरण करणं, भराव टाकून जमीन सपाट करणं, नदीचा प्रवाह बदलणं, उच्चदाबाच्या वाहिन्या भूमिगत करणं या कामांचा समावेश आहे.

✓ सिडकोने तीन टप्यात काम पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. सुरवातीला पहिल्या टप्प्यात वर्षाला 1 कोटी प्रवासी याचा उपयोग करतील, असा सिडकोचा दावा आहे. दुसऱ्या टप्प्यात टप्पात अडीच कोटी आणि 2025 पर्यंत तिसरा टप्पा पूर्ण करीत एकूण 6 कोटी प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता या विमानतळाची असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *