…पण कुठे जायचे हे मागे बसलेले ठरवतात – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. “उद्धव ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो” अशा शुभेच्छा देत फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते.

“आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, हे धोक्याने आलेलं सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे” असेही फडणवीस म्हणाले.

“कोरोना टेस्टिंग वाढवा आम्ही सांगत आहोत, मात्र आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही सर्वात जास्त टेस्टिंग करत आहोत, पण महाराष्ट्र याबाबत १९ व्या क्रमांकावर आहे. मुंबईत टेस्ट होत नाहीत, कारण त्यावर निर्बंध घातले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत लक्ष घातल्यानंतर मृत्यूदर कमी झाला आहे. सेकंड वेव्ह आली नाही, तर एका महिन्यात मुंबईत परिस्थिती आटोक्यात येऊ शकते” असा दावाही फडणवीसांनी केला.

हे सरकार पुण्यावर लक्ष देत नाही, पिंपरी चिंचवडला मदत देत नाही. तुम्ही जर मदत केली नाही तर लोकांना खूप अडचण आहे. आम्ही सरकारच्या सोबत आहोत मात्र ही लपवालपवी थांबवा, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली.

“शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यांचा आक्रोश वाढत आहे. कुणाच्या काळात किती मृत्यू, यावर मी विश्वास ठेवत नाही मात्र शेतकऱ्यांना आपण मदत करत आहोत का? शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, कापूस खरेदीही होत नाही. दुधामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना रोज थोडे पैसे मिळतात. आम्ही वर्षभर अनुदान दिले, भुकटीसाठी अनुदान दिले, हजार कोटी अनुदान राज्याने आमच्या काळात दिले. ७ लाख लिटर दूध कुणाचं विकत घेतलं, ते सांगा, कोणत्या डेरीचे मालक आहेत त्यांची माहिती द्या, बांधावर बियाणे देऊन खत देणार, मात्र सरकारी बियाणंच खोटं निघालं” असा घणाघातही देवेंद्र फडणवीसांनी केला.

“काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचं आणि केंद्राने पैसे दिले तर त्याचा वापर करायचा नाही. हे जे थोबाड फोडून बोलत होते की पीएम केअरचा पैसे नाही, मात्र आता आरटीआयमधून ही माहिती समोर आले” असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *