पुणे पदवीधर साठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अरुण लाड , औरंगबादला सतीश चव्हाण…

| पुणे | विधानपरिषद निवडणूकीसाठी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून श्री. अरुण लाड व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून आमदार श्री. सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीकडून लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढणार की महाविकास आघाडी कायम राखत लढत देणार ? यावर आज शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी या निवडणूकीत कायम राहणार हे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज फेसबुक , ट्विटर च्या माध्यमातून उमेदवारांची घोषणा केली. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणूक प्रचार सुरू केला होता परंतु शिवसेना देखील या जागेसाठी आग्रही होती.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने जेष्ठ नेते अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २०१४ च्या निवडणूकीमध्ये श्री लाड यांना उमेदवारी डावल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सारंग पाटील यांच्या विरोधात अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती . पाटील व लाड यांच्यातील मतविभाजनाने चंद्रकांत पाटील निवडून येण्यास मदत झाली होती. भाजप व महाविकास आघाडी या दोघांकडूनही उमेदवारीसाठी सांगली जिल्हयास पसंती दिली आहे, यामुळे इतर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी कशी असेल याकडे लक्ष राहील.

पुणे विभागातून पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी उत्सुक असलेले डॉ. श्रीमंत कोकाटे आपला उमेदवारी अर्ज माघे घेणार की बंडखोरी करणार यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *