पुत्रमोहाचा त्याग करून लोकशाही वाचवण्यासाठी पाऊल उचलावे..

| नवी दिल्ली | काँग्रेस पक्षातील अव्यवस्थेबाबत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी सोनिया गांधी यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सोनियांनी पंतप्रधानपदाची संधी ज्याप्रमाणे त्यागली होती त्याप्रमाणे आता पुत्रप्रेमाचा त्याग करून देशातील लोकशाही वाचवण्यासाठी पाऊल उचलावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवानंद तिवारी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले की, काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक होऊ घातली आहे. या बैठकीमधून काय निष्कर्ष निघेल, हे माहिती नाही. मात्र सध्या काँग्रेसची अवस्था नावाड्याशिवाय जाणाºया नावेसारखी झालेली आहे. त्याला कुणी तारणहार राहिलेला नाही. आता सोनिया गांधींनी ज्याप्रमाणे पंतप्रधानाच्या खुर्चीचा मोह त्यागून काँग्रेसला वाचवले होते. त्याप्रमाणे आता पुत्रमोहाचा त्याग करून देशातील लोकशाही वाचवण्याचा दिशेने पावले उचलली पाहिजेत.

शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवरही जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे अनिच्छुक राजकारणी आहेत. लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही, हे स्पष्ट झालेले आहे. जनतेचे सोडा, ते स्वत:च्या पक्षाच्या लोकांचाही त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे ठिकठिकाणी लोक काँग्रेसपासून दूर जात आहेत, अशी टीका शिवानंद तिवारी यांनी केली.

मात्र सोनिया गांधींच्या नेतृत्वाचे तिवारी यांनी कौतुक केले आहे. प्रकृती खराब असूनही सोनिया गांधी ह्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून कसाबसा पक्षाचा गाडा हाकलत आहेत. मी त्यांचा आदर करतो. मला आठवतेय सीताराम केसरी यांच्या काळात पक्ष अशाच प्रकारे अडचणीत आला होता. तेव्हा त्या परिस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारून पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *