पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडी पदवीधर मतदारसंघातील सर्व जागा लढवणार : राजाभाऊ खटके-पाटील

| सोलापूर / महेश देशमुख | राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू झालेली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर पदवीधर मतदारसंघाची व पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणुका लढण्याची भूमिका महाराष्ट्र विकास आघाडीने घेतल्याची माहिती महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडीचे राज्याध्यक्ष राजाभाऊ खटके-पाटील यांनी दिली. महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी राजाभाऊ खटके-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे पार पडली.

यावेळी पदवीधरांच्या कधी न सुटलेल्या समस्या सोडण्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील जागेवर उमेदवार उभे करून निवडून आणून विधानपरिषदेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडीच्या माध्यमातून पदविधरांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडविण्याचे काम केले जात आहे. ज्या बेरोजगार पदवीधरांची शासकीय नोकरीसाठीची वयोमर्यादा संपली आहे अशा पदवीधरांना प्रतिमहिना पंधरा हजार रुपये शासकीय भत्ता देण्यात यावा, पदवीधर व्यवसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० लाखापर्यंत शासन हमीवर बिगर व्याजी कर्ज उपलब्ध करून मिळावे, पदवीधर महिलांसाठी शासकीय नोकरीची हमी शासनाने घ्यावी. पदवीधर विकास महामंडळाची स्थापना करून पदवीधरांचे प्रश्न सोडवावेत या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडीच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून याबाबत सतत पाठपुरावा व आंदोलने करण्यात येत असतात. परंतु त्याला अद्याप म्हणावे तसे यश मिळालेले नाही त्यामुळे महाराष्ट्र पदवीधर आघाडीचा उमेदवार विधान परिषदेत पाठवून या सर्व मागण्या शासन स्तरावर मान्य करून घेण्यासाठी निवडणूक लढण्याची भूमिका घेतली असल्याचे राज्याध्यक्ष राजाभाऊ खटके-पाटील यांनी सांगितले.

यावेळी उमेदवार निवडीसाठी राज्याध्यक्ष राजाभाऊ खटके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडीचे उपाध्यक्ष दत्तात्रय तोरणे व महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सविता कस्तुरे यांची समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडीचे वैशिष्ट्य म्हणजे आघाडी सर्वसमावेशक असून आघाडीच्या कार्यकारणी मध्ये विविध पदवीधर शाखेतील पदवीधरांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडीच्या वतीने प्राथमिक सदस्यत्व नोंदणी करण्यात आली आहे. पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदस्यत्व स्वीकारण्याचे आवाहन राज्य खजिनदार अनिल पाटील यांनी केले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य व अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष अल्ताफ जागीरदार, प्रदेश सरचिटणीस चंद्रहास काळे, प्रदेश सचिव राहुल जरे, कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील, वासुदेव तेरखेडकर , तानाजी साळुंखे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.