प्राथमिक शिक्षकांना शिक्षक आमदारकी मतदान हक्कासाठी करावा लागणार संघर्ष, निवडणूक आयोगाकडून मिळाली ही माहिती..!

| मुंबई / विनायक शिंदे | महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत खाजगी, जिल्हा परिषद, महानगरपालिका , नगर परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा अशी मागणी एक्का फाऊंडेशन ठाणे चे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

महाराष्ट्र विधान परिषद करिता शिक्षक मतदारसंघातून ७ विधान परिषद सदस्य शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करत असतात. कोकण , मुंबई, पुणे, नाशिक , औरंगाबाद , नागपूर या शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद सदस्य निवडले जातात. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघामध्ये मतदार होण्यासाठी माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या अशा तसेच त्या राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाच्या कामात निदान तीन वर्ष अनुभव आवश्यक आहे.

एक्का फाऊंडेशन ठाणेच्या वतीने राज्य निवडणूक शाखेस राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद शिक्षकांना विधान परिषद शिक्षक मतदारसंघांमध्ये मतदान करण्याचा हक्क प्राप्त व्हावा यासाठी पाठपुरावा चालू होता. प्राथमिक शिक्षकांना शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क देण्याबाबतची तरतूद लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये करणे आवश्यक आहे असे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वतीने प्राजक्त झावरे पाटील अध्यक्ष एक्का फाऊंडेशन ठाणे यांना पत्राद्वारे कळवले आहे.

म्हणजे एकंदरीत राज्यातील विधानपरिषद शिक्षक मतदारसंघामध्ये सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क प्राप्त करुन घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

✓ ” राज्यातील शिक्षक आमदारांना माध्यमिक शिक्षक आमदार असे नामकरण करावे किंवा सर्वाधिक संख्येने असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे. ह्या मागणीचा जोर धरावा लागेल. जे मतदार असतात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकची प्रयत्नशीलता प्रत्येक वेळी दाखवली जाते. त्यामुळे या प्राथमिक शिक्षकांना देखील या प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे.”

– प्राजक्त झावरे पाटील,
अध्यक्ष, एक्का फाउंडेशन तथा राज्य माध्यम प्रमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *