प्रवास सुलभ, राज्यात खासगी बसेसना १००% क्षमतेने प्रवासी वाहतुकीस मंजुरी..!

| मुंबई | “मिशन बिगिन अगेन”अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवले जात आहेत. त्यास अनुसरून राज्यात खासगी बसेसना १००% टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत त्यांना प्रवास करता येणार नाही. याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने शुक्रवारी जारी केले. कोरोनामुळे राज्यात खासगी वाहतुकीवर निर्बंध घातले होते. काही काळानंतर खासगी वाहतुकीस ३०% प्रवासी क्षमतेने परवानगी दिली होती.

आता १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. यात सर्व प्रकारच्या खासगी, कंत्राटी वाहनांचा समावेश आहे. तथापि, खबरदारी म्हणून काही उपाययोजना, नियमांचे पालन करावे लागणार आहे. परिवहन विभागाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. एका फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे लागेल. बसचे आरक्षण, नियंत्रण कक्ष, कर्मचारी, कार्यालयाचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर करणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान नाष्टा, जेवण करतेवेळी तेथील ठिकाण, उपाहारगृहे निर्जंतुकीकरण केलेली असावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *