पळसदेव मध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश.

| इंदापूर / महादेव बंडगर | शनिवार दिनांक 26. 9. 2020 रोजी पळसदेव येथे भटक्या समाजातील एका पंधरा वर्षीय मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले आहे. सदर बालविवाह होणार असल्याचा गोपनीय संदेश “चाइल्ड हेल्पलाईन” ला मिळाला होता. त्यानुसार त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय पुणे यांचेकडे संपर्क साधला व होणारा नियोजित विवाह सोहळा रोखण्यात यावा याबाबत विनंती केली.

त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय पुणे यांनी इंदापूर चे संरक्षण अधिकारी श्री शेखर बंडगर यांना याबाबत संबंधित बालविवाह रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर श्री. बंडगर यांनी संबंधित विवाह कोठे होत आहे याबाबतची माहिती तालुक्यातील विविध पोलीस स्टेशन व तसेच त्यांच्या महिला व बालविकास विभागाच्या गोपनीय यंत्रणेच्या मदतीने घेतली. हा बालविवाह पळसदेव येथे होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यासोबत मुलीच्या भावाचा मोबाइल नंबर मिळालेला होता. परंतु सदर व्यक्तीने मोबाईल फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. पळसदेव या ठिकाणी जाऊन हा विवाह रोखण्यात यश मिळवले संबंधित मुलीचे आई-वडील, नवरदेव व नवरदेवाचे आई-वडील यांना ते करत असलेल्या चुकीच्या गोष्टीबाबत कल्पना देण्यात आली. व बालविवाह प्रतिबंधक कायदा-2006 नुसार हा शिक्षापात्र गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले व त्यांना नोटीस देऊन आपापल्या घरी जाण्यास सांगितले. संबंधित मुलगी यवत ता. दौंड येथील असून मुलगा पळसदेव गावचा रहिवाशी आहे.

आज 21 व्या शतकात शासन विविध माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण काही मागास समाजात आजही मुलगी ओझे समजून तिला शिक्षणापासून वंचित ठेऊन तिचा लहान वयातच विवाह करून देत आहेत व जबाबदारीतून मुक्त होत आहेत.त्यामुळे महिला दक्षता समिती,स्त्री आधार केंद्र यासारख्या संस्थांनी याबाबतीत कठोर भूमिका घेऊन असे विवाह रोखले पाहिजेत.महिला व बालविकास विभागामुळे आज एका अल्पवयीन मुलीला आम्ही न्याय मिळवून देऊ शकलो अशी भावना श्री.बंडगर यांनी व्यक्त केली आहे.

याकामी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक दीपक पालके, पळसदेवचे पोलीस पाटील श्री. कुचेकर, ग्रामविकास अधिकारी श्री. भुजबळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.