” पवार साहेब ग्रेट आहेत..” अध्यादेशाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला..

| मुंबई | मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली, त्याचे अपयश सरकारने मान्य करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अशोक चव्हाणांना कायदा कळतो का नाही? केंद्र सरकार यात पार्टीच नव्हते, तर केंद्राचा संबंध काय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी अध्यादेशाचा पर्याय सुचवला होता, पण यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. ‘पवार साहेब ग्रेट आहेत. सुप्रीम कोर्टात घटनापीठाकडे निर्णय जातो, मग अध्यादेश कसा काढायचा? लोकांनी आंदोलन करू नये, म्हणून त्यांना फसवलं जात आहे. उगीच दिशाभूल करू नका. कायदा स्टे झाला, तर मग अध्यादेश कसा निघेल?’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले, मग सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही? वकिलांना दिशा देण्याचा प्रयत्न झाला नाही, असा आरोप पाटील यांनी केला. तसंच आमचं सरकार असतं तर आरक्षण १०० टक्के टिकलं असतं, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

‘आम्ही चिथावणी देत नाही, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. लोकांनी रस्त्यावर उतरणं स्वाभाविक आहे. कोरोना असूनही कंगनाचे घर तोडतात. एका विशिष्ट घरात पार्टी केल्या जातात. आमच्याकडे व्हिडिओ क्लिप आहेत, मग आंदोलन का चालणार नाही?’, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राजकारणात येईपर्यंत मला ही माणसं मोठी वाटायची, पण आता लक्षात आलं की यांना काहीच कळत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला. आरक्षण मिळणार नसेल, तर आरक्षणाएवढ्याच सुविधा मराठा समजाला मिळायला हव्यात, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *