पाहिलीतील प्रवेशासाठी नवी अट , डिसेंबर ३१ पर्यंत ६ वर्ष पूर्ण असावेत..!

| मुंबई | राज्यात पहिलीतल्या प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला आहे. आता ३० सप्टेंबरऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या मुलांना पहिलीसाठी प्रवेश घेता येईल. याचा अर्थ असा की ३१ डिसेंबरआधी मूल सहा वर्षांचे झाले तर त्याला पहिलीत प्रवेश मिळू शकेल. प्रवेशासाठी पुढील वर्षाच्या जूनपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. याच निकषावर नर्सरी, प्ले स्कूल, बालवाड्या यांचेही प्रवेश होतील. सर्व बोर्डांना हा नियम लागू आहे.

आता नव्या निकषामुळे साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुलांचे ३१ डिसेंबपर्यंतचे वय गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे प्राथमिक कौशल्ये विकसित होण्यापूर्वी लेखन, वाचन असा अभ्यासाचा भार साडेपाच वर्षांच्या मुलांना सोसावा लागणार आहे.

दरम्यान, शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑगस्टमध्ये जन्माला आलेल्या मुलांचे काहीच दिवसांच्या फरकाने नुकसान होत असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला. त्यानंतर २०१७ मध्ये या निकषात सुधारणा करून ३० सप्टेंबपर्यंतचे वय ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेल्या मुलांचे नुकसान होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. म्हणून शिक्षण विभागाने ही अट पुन्हा बदलली.

१५ ऑक्टोबपर्यंत सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिली प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आले. तरीही ही अट पुन्हा बदलण्याची पालकांची मागणी होती. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२१-२२) ३१ डिसेंबपर्यंत सहा वर्षे पूर्ण होत असलेल्या मुलांना जूनमध्ये पहिलीच्या वर्गात बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *