बोगस ई पास प्रकरणी आवाज उठवणाऱ्या मनसेचाच पदाधिकारी बोगस ई पास प्रकरणी अटकेत..!

| ठाणे | ‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून अतिशय जोरदार प्रकारे करण्यात आली होती. एका वायरल ध्वनिफितीच्या आधारे नाशिक क्राईम ब्रँचच्या युनिट १च्या पथकाने बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश करत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील रहिवाशी असलेला संशयित राकेश सदानंद सुर्वे उर्फ कृष्णा यास गुरुवारी (दि. २७) बेड्या ठोकल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे हा सुर्वे मनसेचा गुहागर तालुका संपर्क सचिव असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे, चिरंजीव अमित ठाकरे , मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक नेत्यांच्या सोबत त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यामुळे या कारवाईकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे, जोरकस मागणी करणारे संदीप देशपांडे, मनसे यांची काय भूमिका असेल याबाबतही विविध चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे.

कोरोना संक्रमणामुळे आंतरजिल्हा तसेच राज्यात प्रवास करण्यावर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. स्थानिक पोलिस प्रशासनाकडून पास प्राप्त करून घेतल्यानंतरच प्रवासाला विविध अटी व शर्तीनुसार परवानगी दिली जाऊ लागली. याचा फायदा काही भामट्यांनी घेत बनावट ई-पास बनविण्याची युक्ती शोधून काढत हजारो ते लाखो रुपये कमविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ई- पासबाबतची ध्वनीफित व्हाट्सएपच्या माध्यमातून व्हायरल झाली, आणि पोलिसांसाठी हाच महत्वाचा धागा ठरला. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी याप्रकरणी येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा नोंदविला.

तंत्रिकविश्लेषणाच्या सहाय्याने नाशिकच्या क्राईमब्रँच युनिट-१च्या पथकाने ध्वनिफीतमधील आवाजाचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. त्यावरून तपासाचे धागेदोरे थेट रत्नागिरीच्या गुहागरपासून मुंबईच्या डोंबिवलीपर्यंत जाऊन पोहोचले.

व्हाट्सअॅपवर व्हायरल ध्वनीफितमधील आवाज असलेल्या मोबाईलधारक संशयित मनसेचा गुहागर तालुका सचिव असलेल्या सुर्वे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत काही प्रवाशांकडून लॉकडाऊन काळात मुंबई येथून रत्नागिरीला जाण्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये घेत पोलिसांच्या नावाने बनावट ई-पास इतर ठिकाणांवरुन काढून दिल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता ईपास काढण्यासाठी वापर करत असलेला टॅब, मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान , मनसेचा पदाधिकारी असणाऱ्या या भामट्याचे डोंबिवलीत काही संबंध होते का..? तिथं काही अशी बनावट ई पास बनविणारी टोळी आहे का? हे पुढील तपासात समोर येईल. पुढील तपास श्री. पालकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *