बेडकांच्या डराव डरावला कोणी घाबरत नाही – खासदार विनायक राऊत

| मुंबई | दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचे नाव न घेता बेडूक आणि त्याची पिल्ले यांचे उदाहरण दिले. हे ऐकून नाव न घेता दिलेले हे उदाहरण चक्क माझ्यासाठीच आहे, असा ठाम विश्वास असणाऱ्या एका गृहस्थाने डरावSss ..डरावलाSss करायला सुरुवात केली. पावसाळा संपला असला तरी हे डरावSss ..डरावलाSss करणे संपणार नाही. त्यांच्या डरावSss ..डरावलाSss ला कोणीही घाबरणार नाही, असे सडेतोड उत्तर शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांना दिले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भाषणानंतर काल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. त्या टीकेला खासदार विनायक राऊत यांनी उत्तर दिले.

राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाषणात बेडूक आणि त्याची पिल्ले असा उल्लेख केला. हा उल्लेख आपल्यासाठीच आहे असा साक्षात्कार नारायण राणे यांना झाला. त्यामुळेच त्यांनी काल डरावSss ..डरावलाSss केले. त्याला कोणीही घाबरणार नाही.

नारायण राणे हे सुध्दा मुख्यमंत्री होते. त्या मुख्यमंत्री पदाला काळीमा फासणारी भाषा, अश्लाघ्य भाषा नारायण राणे यांनी वापरली आहे, त्यामुळे तुमची लायकी यापूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी दाखवून दिली आहे. आता महाराष्ट्रातील जनता तुमची लायकी दाखवून देईल, अशा शब्दात खासदार राऊत यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *