…. बस हेच बाकी होते, पुणे जिल्हा परिषदेत शिक्षक झाले कोविड रुग्णालयातील कंपाऊंडर..!

| पुणे | पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना कोविड रुग्ण आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापन व समन्वयासाठी ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश काढल्याने शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. रुग्णांना बेड उपलब्धता, अॅडमिशन, डिस्चार्ज, रुग्णांची वाहतूक व्यवस्था सांभाळणे यासाठी ‘रुग्णालय व्यवस्था सनियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कोविड रुग्णालयांमध्ये विविध कामांसाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना नियुक्त केले आहे. या कामांची यादी व स्वरूप पाहिले असता जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांचा उपमर्द करण्यात कसलीही कसर सोडलेली नाही असे दिसते.

शिक्षकांना दिलेली कामे:

१) रुग्णालयातील बेडची उपलब्धता पाहणे. बेडची संख्या कमी असेल तर रुग्णालय व्यवस्था सनियंत्रण कक्षाला कळवणे.
२) रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची सर्व माहिती घेणे. रुग्ण कोणत्या शासकीय योजनेखाली उपचार घेण्यास पात्र आहे याची माहिती घेणे.
३) रुग्णालयाचे व्यवस्थापक, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, रुग्णाचे नातेवाईक यांच्यामध्ये समन्वय ठेवणे.
४) रुग्णाचा चाचणी अहवाल निगेटिव आल्यास रुग्णाला त्याच्या घरी पोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्याकमी समन्वयकाची भूमिका पार पडणे..

या अनुषंगाने येणारी इतर कामेही शिक्षकांना पार पाडावी लागणार आहेत. सध्या शाळा सुरू नसल्या तरी शिक्षक ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. काही प्रसंगी शाळेत सुद्धा जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कामे लावून जिल्हा प्रशासनाने शिक्षकांचा अपमान केला आहे. शिक्षकी पेशाचे अवमूल्यन केले आहे, अशी शिक्षकांमध्ये भावना आहे. अनेक शिक्षकांनी या गोष्टीचा निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *